जमिनीच्या वादातून मारहाण करून दागिने पळविले

women-beaten

रत्नागिरी(प्रतिनिधी) :जमिनीच्या वादातून पावस बाजारपेठेतून जाणाऱ्या दिगंबर भरत पाटील (५०, मावळंगे, रत्नागिरी) यांची दुचाकी अडवून त्यांना लोखंडी टॉमीने मारहाण करण्यात आली. यावेळी त्यांच्या गळ्यातील ८० ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी व हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या असा २,२४,००० रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेण्यात आला.

तसेच शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दिगंबर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूर्णगड पोलिसांनी आनंद सुभाष जाधव (रा. मावळंगे, रत्नागिरी) व उदय पेडणेकर (रा. शेळवी हर्चे, ता. लांजा) या संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पूर्णगड पोलिसांनी जाधव व पेडणेकर यांना अटक केली आहे.

फिर्यादी दिगंबर भरत पाटील हे पावस बाजारपेठेतून आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच ०८, एच ९८४१)ने एकटेच घरी निघाले होते. ते पावस येथील गोडबोले दुकानाच्या पुढे मारूती मंदिरजवळ आले असता, दोन्ही आरोपींनी त्यांच्या दुचाकीसमोर आपली बोलेरो गाडी (एमएच ०८ एपी ०५२५) ही आडवी घातली व दुचाकी अडवली. त्यानंतर दोघांनीही फिर्यादी पाटील यांना मारहाण तसेच शिवीगाळ करीत त्यांच्याकडील दागिने काढून घेतले. याप्रकरणी पूर्णगड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३९४, ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४नुसार गुन्हा दाखल केला आहे.