विरोधकांचा समाचार आम्ही घेणार, तुम्ही कामाला लागा; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश

Uddhav Thackeray

मुंबई :- विरोधक आपल्याबाबत काय बोलतात त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत. तुम्ही महापालिकेच्या कामाला लागा. योग्य नियोजन करून जय्यत तयारी करा, असे आदेशच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने रणशिंग फुंकले आहे. तसेच मनसेसोबत युती करण्याचे संकेतही भाजपने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी आज शिवसेना आमदार आणि पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी पदाधिकारी आणि आमदारांचं म्हणणं ऐकून घेतलं. तसेच प्रत्येकाच्या मतदारसंघाचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी शिवसैनिकांनी कोरोना (Corona) संकटात केलेल्या कामाचं कौतुक करून आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. या वर्षात कोरोनाच्या संकटामुळे जनतेच्या विकासाचं काम आपल्याला करता आले नाही. पण आता कुठलंही मोठं संकट येवो. केवळ काम करायचं. स्वत:ची आणि आपल्या परिवाराची काळजी घेऊन जनतेची कामं करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं शिवसेनेचे चेंबूरमधील आमदार प्रकाश फातर्पेकर यांनी सांगितलं.

मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) निवडणूक वर्षाभरानंतर होणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहायला हवे. आपल्या प्रत्येक शिवसैनिकाला आतापासूनच निवडणुकीच्या कामाला लावा. गेल्यावेळी आपण कुठे मागे पडलो ते पाहा आणि जोमाने कामाला लागा. विरोधक काय बोलतात त्याकडे दुर्लक्ष करा. तुम्ही निवडणुकीची तयारी करा. विरोधकांचा समाचार घेण्यास आम्ही सक्षम आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं.

मुंबई आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. पण काही लोक आता पालिकेवरील शिवसेनेचा भगवा फडकविण्याचे स्वप्न बघत आहेत. त्यासाठी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचे, शिवसेनेला बदनाम करण्याचे प्रयत्नही विरोधकांकडून सुरू झाले आहेत. त्यांचे हे मनसुबे उधळून लावण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळाली.

ही बातमी पण वाचा : भगवा तर तुम्हीच उतरवला, आता मुंबईकर करून दाखवतील; आशिष शेलार यांचा शिवनेनेला टोमणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER