धीर धरा… हे दिवसही जातील

Swapnil Joshi

अनेक आशा अपेक्षा घेऊन 2020 हे वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात आले. या वर्षाचे पहिले दोन महिने अगदी छान नेहमीप्रमाणे गेले. मात्र मार्च महिन्यात कोरोनाचे संकट आले आणि आपल्या देशातील प्रत्येकजण हादरून गेला. अनेक क्षेत्रातील घडामोडी थांबल्या. आयुष्य बदलून गेलं. आर्थिक घडी विस्कटली. या सगळ्यावर अभिनेता स्वप्नील जोशी नुकताच व्यक्त झाला आणि त्याने, हे दिवसही जातील…धीर धरा… 2020 हे वर्ष संपायला आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. नवं वर्ष नव्या आशा घेऊन येईल असा आशेचा किरण दाखवत चाहत्यांशी संवाद साधला.

कोरोनामुळे (Corona) खरोखरच 2020 हे वर्ष प्रत्येकासाठी वेगवेगळ्या अर्थाने अविस्मरणीय ठरले. खरतर 2020 हे वर्ष देश महासत्ता होण्याची स्वप्न बघत होतं. मात्र कोरोनाच्या साथीने विकास कामांना देखील कात्री लावावी लागली. इतकेच नव्हे तर देशाची आर्थिक गाडी थांबली. जवळपास सात ते आठ महिने अर्थचक्र रुतून बसलं होतं. याचा फटका रोज काम केल्यानंतर संध्याकाळी पैसे मिळवणारया घटकापासून ते अगदी लाखो-करोडोत खेळणाऱ्या श्रीमंत व्यापारी आणि उद्योजकांच्या कमाईवरही झाला. अनेकांच्या हातातील नोकऱ्या गेल्या. ज्यांच्या नोकऱ्या आहेत त्यांचे पगार निम्म्यावर आले. अशा अनेक गोष्टींनी माणसाच आयुष्य बदलून गेलं याला सेलिब्रिटी कलाकार देखील अपवाद नाहीत.

स्वप्निल म्हणतोय, अनेकांच्या हातातले प्रोजेक्ट थांबल्यामुळे शूटिंग बंद होतं. याच दरम्यान अनेक कलाकारांनी आत्महत्येचा मार्ग देखील पत्करला. खरतर कलाकारांना अशाप्रकारे दीर्घ सुट्टी मिळणं ही पर्वणी असते. मालिका, नाटक, सिनेमा यांच्यासाठी आधी तारखा दिलेल्या असल्यामुळे याच्यातून वेळ काढत एखाद्या मोठ्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कलाकार आसुसलेले असतात. त्यामुळे सुरुवातीला कोरोनामुळे लॉक डाऊन झालं आणि सगळे कलाकार घरी होते त्यांच्या कुटुंबीयांमध्ये वेळ घालवत होते तेव्हा पहिले काही दिवस त्यांना देखील खूप छान वाटलं. मात्र त्यानंतर हातात काम नसल्याने येणारे रिकामेपण कलाकारांना त्रासदायक झाले. सुरुवातीच्या दिवसांमध्ये मे महिन्यांपर्यंत ही परिस्थिती निवळेल असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु पावसाळा संपला तरीही कोरोनाची धास्ती कमी येत नव्हती. गणपती, दसरा दिवाळी, पाडवा हे सगळे सण कधी आले आणि कधी गेले कळलंच नाही. दिवाळीच्या निमित्ताने थोडासा उत्साहाचा माहोल दिसला पण अजूनही कोरोनाचे सावट म्हणावं तितकं कमी झालेलं नाही. 2020 हे वर्ष संपण्याच्या मार्गावर आले आहे. याच निमित्ताने स्वप्नील जोशी त्याच्या सोशल मीडिया पेजवर चाहत्यांसमोर आला आहे.

समाजामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींबाबत तसेच चुकीच्या घटनांबाबत कलाकार त्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया पेजवर व्यक्त होत असतात. कोरोनाचा फटका सांस्कृतिक क्षेत्राला तसेच मनोरंजन क्षेत्राला बसल्यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये याबाबत कलाकारांनी त्यांची मतं तसेच त्यांच्या भूमिका देखील मांडल्या होत्या. स्वप्नील जोशी याने संपूर्ण वर्षभरातल्या कोरोना परिस्थितीचा एका कलाकाराच्या दृष्टीने वेध घेत आता हे वर्ष संपायला काही दिवसच शिल्लक असल्याची भावना व्यक्त केली आहे . त्याच्या या खास पोस्टला त्याच्या चाहत्यांनी देखील दाद दिली आहे. स्वप्नील सांगतो, मनोरंजन क्षेत्रामध्ये जेव्हा संपूर्ण काम थांबलं तेव्हा कॅमेरामागे काम करणाऱ्या अनेक तंत्रज्ञांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा वेळी कलाकारांनी या तंत्रज्ञांना मदतही केली होती. आता शूटिंग काही प्रमाणात सुरू झालं असलं तरी पडद्यामागच्या कलाकारांची आर्थिक गाडी सुरू व्हायला थोडासा वेळ लागणार आहे. त्यामुळे आता पुढच्या वर्षात चित्र बदलेल या आशेवर सगळ्यांची मदार आहे. म्हणूनच मला असं वाटलं की डिसेंबर हा महिना शेवटचा महिना आहे. त्यामुळे वर्ष संपणार हा विचार आपल्याला नवं काहीतरी करण्याची उमेद देणार आहे.

सध्या स्वप्नील जोशीची चला हवा येऊ द्या या शोमध्ये विशेष पाहुणा म्हणून एंट्री झाली आहे. त्याचा या शोमध्ये सहभाग प्रेक्षकांना नक्कीच आवडतो आहे. शिवाय चॉकलेट बॉय अशी जरी पडद्यावर त्याची प्रतिमा असली तरी वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होणं यासाठीही स्वप्नीलचा नेहमीच पुढाकार असतो. त्यामुळे त्याने कोरोनाच्या विळख्यात अडकलेले हे वर्ष संपण्याच्या उंबरठ्यावर असताना धीर धरा… हे ही दिवस जातील हे त्याचं वाक्य नक्कीच अनेकांना बळ देणारं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER