B’day Special: IPL मध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज आहे मनीष पांडे

Manish Pandey

२००८ मध्ये IPL कारकीर्दीची सुरुवात करत २०१५ मध्ये भारतीय संघात स्थान मिळवले, IPLच्या या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे मनीष.

मनीष पांडे (Manish Pandey) आज आपला ३१ वा वाढदिवस साजरा करीत आहे. १० सप्टेंबर १९८९ रोजी उत्तराखंडच्या नैनीताल येथे जन्मलेल्या मनीषने बंगळूरमधून शिक्षण घेतले. लहानपणापासूनच फलंदाजीची आवड ठेवणारा मनीष नंतर कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचा एक भाग बनला आणि त्याने आपला क्रिकेट प्रवास सुरू केला. हळू हळू पुढे जात मनीषने पाऊल पुढे टाकले आणि घरगुती क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली.

२००८ च्या अंडर -१९ विश्वचषकात मनीष संघाचा भाग होता आणि त्यावर्षी भारतीय संघाने ही ट्रॉफी जिंकली होती, विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारताने ही ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर त्याला IPL मध्ये खेळण्याची सुवर्णसंधी मिळाली आणि त्याने त्या संधीचे भांडवलही केले.

२००८ मध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून IPLमध्ये पदार्पण केले, पण काही खास कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. पण पुढच्या हंगामात सर्वांनी मनीषच्या फलंदाजीची ताकद पाहिली. २१ मे २००९ रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत त्याने डेक्कन चार्जर्सविरूद्ध शतक झळकावले आणि त्याबरोबर मनीष IPLमध्ये शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. मनीषने ७३ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ११४ धावा फटकावले होते.

त्यानंतर तो पुणे वॉरियर्स आणि कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. २०१४ मध्ये केकेआरचे जेतेपद मिळविण्यात या फलंदाजाचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्याला सनरायझर्स हैदराबादने २०१८ मध्ये ११ कोटींमध्ये खरेदी केले आणि तो संघातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. यानंतर हैदराबादने त्याला २०१९ मध्येही कायम ठेवले आणि यावर्षीही हा खेळाडू सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसणार आहे.

भारतीय संघाबद्दल बोलायचे तर मनीषला त्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागली. IPLच्या पहिल्या शतकाच्या ६ वर्षानंतर मनीषला टीम इंडियामध्ये स्थान मिळालं, पण भारतीय संघात सतत मिळालेल्या संधींचा फायदा तो घेऊ शकला नाही. त्याने १४ जुलै २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला होता. मनीषने आतापर्यंत फक्त २६ एकदिवसीय सामने खेळले आहे, ज्यात त्याने ३५.१४ च्या सरासरीने एकूण ४९२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि दोन अर्धशतकेही आहेत. त्याचबरोबर मनीषने ३८ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४७.१३ च्या सरासरीने ७०७ धावा केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER