बीसीसीआयचा खजिना म्हणजे अलीबाबाची गुहा!

BCCI

जगातील सर्वांत धनवान क्रिकेट मंडळ आणि धनाढ्य क्रीडा संस्थांपैकी एक गणल्या जाणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या खजिन्यात किती रक्कम असेल? काही अंदाज? आकडा ऐकाल तर चकित व्हाल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा खजिना २०१८-१९ अखेर तब्बल १४ हजार ४८९ कोटींचा आहे. मंडळाच्या खजिन्यात २,५९७.१९ कोटींची भर पडली आहे. वृत्तसंस्थांना उपलब्ध झालेल्या मंडळाच्या ताळेबंदातून ही माहिती समोर आली आहे. २०१८ च्या आयपीएलामधूनच बीसीसीआयला २४०७.४६ कोटींची प्राप्ती झाली आहे.

मंडळाचा २०१९-२० चा ताळेबंद अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मात्र यासोबतच मंडळ बऱ्याच आर्थिक दाव्यांमध्येसुद्धा अडकले आहे. त्यात आयकर विभाग, कोची टस्कर्स व डेक्कन चार्जर्स, वर्ल्ड स्पोर्टस् ग्रुप आदींचा समावेश आहे. ही सर्व प्रकरणे बीसीसीआयच्या विरोधात गेले तर मात्र त्यांचा खजिना मोठ्या प्रमाणात रिता होण्याची शक्यता आहे. २०१८-१९ मध्ये बीसीसीआयला आयपीएलपाठोपाठ भारतीय संघाच्या प्रसारण हक्कातून ८२८ कोटींची कमाई झाली आहे. २०१४-१५ अखेर मंडळाची एकूण मालमत्ता ५३४८.६१ कोटींची होती.

२०१५-१६ मध्ये हीच रक्कम ७८४७.०७ कोटींपर्यंत पोहचली होती. २०१६-१७ मध्ये आठ हजार कोटींचा टप्पा ओलांडून हीच रक्कम ८४३१.८६ कोटी झाली होती. २०१७-१८ मध्ये यात तब्बल ३४६०.७५ कोटींची भर पडली आणि बीसीसीआयने १० काय ११ हजार कोटींचाही टप्पा ओलांडून ११,८९२.६१ कोटीपर्यंत मजल मारली. आणि आता हीच रक्कम १५ हजार कोटींच्या उंबरठ्यावर ( १४४८९.८० कोटी) पोहचली आहे. पतसंस्था कायद्यान्वये बीसीसीआयची नोंदणी आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष संपल्यावर सहा महिन्यांत त्यांना ताळेबंद सादर करणे बंधनकारक आहे.

बीसीसीआयचा हा खजिना बँकामधील शिल्लक, ठेवी आणि स्थावर मालमत्तेतून आहे. २०१८-१९ मध्ये आयपीएलशिवाय भारताच्या वरिष्ठ संघांचे दौरे व स्पर्धा, बँकांकडील व्याज आणि आयसीसी व एसीसीकडून मिळणारी रक्कम याने बीसीसीआयचा खजिना फुलला आहे. विविध स्पर्धांच्या प्रसारण हक्कांनी मंडळाच्या कमाईत मोठी भर घातली आहे. २०१८-१९ मध्ये याद्वारे ९५०.४० कोटींची कमाई झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER