‘बायको देता का बायको’च्या कलाकारांना मारहाण प्रकरणी सगळ्यांचे तोंडावर बोट !

bayko-deta-ka-bayko-flim actor-and-director-of-beaten-in-beed

बीड : ‘बायको देता का बायको’ चित्रपट मागच्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. शो पाहण्यासाठी चित्रपटातील काही कलाकार बीड शहरातील टॉकीजमध्ये आले होते. त्यावेळी या कलाकारांवर जीवघेणा हल्ला झाला. चित्रपटाचे अभिनेता आणि निर्माता जखमी झाले. मात्र, तीन दिवसांनंतरही या हल्ल्याचे कारण उलगडले नाही. या प्रकरणी कोणी तक्रारही केली नाही.

चित्रपट पाहण्यासाठी आलेल्यात चित्रपटातील कलावंत सुरेश ठाणगे, धनंजय यमपुरे आणि ऐश्वर्या कुळकर्णी होते.

कलाकारांसोबत चर्चा करण्यासाठी काही माध्यम प्रतिनिधी आले होते. मुलाखत सुरू असताना सात- आठ जणांचे टोळके आले. तुमचा चित्रपट बंद करा, असं म्हणत कलाकारांना शिव्या घातल्या. सुरेश ठाणगे आणि निर्माता धनंजय यमपुरे यांना जोरदार मारहाण केली. ऐश्वर्या कुळकर्णी पळून जाऊ शकली म्हणून वाचली.

मारहाणीनंतर धनंजय यमपुरे आणि सुरेश ठाणगे यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, या मारहाण प्रकरणी एकानेही पोलिसांमध्ये तक्रार दिलेली नाही. पोलीस कॉन्स्टेबल अंबादास औसारमल यांच्या तक्रारीवरून अज्ञात सात ते आठ जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.

ज्या चित्रपटगृहामध्ये हा हल्ला झाला, तिथले सीसीटीव्ही चालू होते, मीडियाच्या कॅमेरामध्येही हा हल्ला पूर्णपणे रेकॉर्ड झालेला आहे. असे असतानाही अद्याप या हल्ल्यातले मारेकरी कोण आहेत याची माहिती उघड झालेली नाही!