कॉलर आणि मिशीची लढाई

Shrinivas Patil-Udyanraje copy

badgeविधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूकही होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने ही पोटनिवडणूक लागली आहे. कॉलर उडवण्याच्या स्टाईलमुळे लोकप्रिय उदयनराजेंची इथे आपल्या पीळदार मिशांमुळे प्रसिद्ध राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांच्याशी लढाई आहे. कॉलर आणि मिशीच्या लढाईत कोण विजयी होतो याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राजाला साताऱ्यात हरवणे तसे कठीण आहे. सातारा हा राष्ट्रवादीचा गड आहे. पण यावेळी राजाविनाच त्यांना किल्ला लढवावा लागत आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजे पाच महिन्यांपूर्वी राजाने सव्वा लाख मतांनी मैदान मारले होते. तरीही त्यांचे मताधिक्य आधीच्या निवडणुकीपेक्षा अडीच लाखांनी घटले होते. त्यामुळे विजयी होऊनही राजाने गुलाल उधळला नव्हता. आता बदललेल्या राजकीय हवेमुळे राजाला ही पोटनिवडणूक म्हणावी तेवढी सोपी राहिलेली नाही.पुढाऱ्यांच्या पक्षांतरामुळे नरमलेली राष्ट्रवादी पवारांमागे ईडी लागल्याचे पाहून अचानक आक्रमक झाली आहे. खुद्द राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार हाती तलवार घेऊन मैदानात उतरले आहेत.

राजा भाजपमध्ये गेल्याचा वार शरद पवारांच्या जिव्हारी लागला आहे. साताऱ्यात पवारांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे राजे हादरले. ‘पवार उभे राहात असतील तर आपण लढणार नाही’ असे त्यांना सांगावे लागले. आपला लंगोटीमित्र मराठा रांगडा गडी श्रीनिवास पाटील यांना आखाड्यात उतरवून पवारांनी थरार वाढवला आहे. सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि सनदी अधिकारी म्हणून काम केलेले पाटील राष्ट्रवादीतर्फे दोन कुस्त्या याआधी जिंकले आहेत; पण ही कुस्ती वेगळी आहे. दोन्ही पहिलवान बरोबरीचे आहेत. त्यांना लढवणारे चाणक्य आहेत. त्यामुळे काहीही होऊ शकते. राजा जिंकला तर पवारांचे राजकारण हरेल. मात्र हरला तर राजाचे नव्हे तर भाजपचे पानिपत ठरेल.