तुळस – प्रत्येक घरातील रोगहारीणी वनस्पती !

Basil

तुळशीचे वृंदावन किंवा तुळशीचे एक रोप तरी घरातील कुंडीत नसणारे घर विरळेच. तुळशीला आपल्या संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व आहे. देवपूजे करीता असो किंवा नैवेद्याच्या ताटावर असो तुळशीपत्र आवश्यक. तुळस अत्यंत गुणकारी आहे म्हणूनच दैनंदिन जीवनात त्याचा वापर पूर्वापार आपसूकच लोक करताहेत. आयुर्वेदात (Ayurveda) सुरसा (तुळशीचारस गुणकारी असल्याने व देवाला वाहतात म्हणून). भूतघ्नी (जंतुनाशक असल्याने), बहुमंजिरी, सुलभा, ग्राम्या (घराघरात रोप लावल्या जाते) अशी वेगवेगळी नावे तुळशी करीता आली आहेत. तुळशीचे वर्णन आयुर्वेदात श्वास (दमा) कमी करण्याकरीता उत्तम सांगितला आहे. तुळस कडू तिखट रसाची व उष्ण असते. तुळस कृमिनाशक सांगितली आहे. तुळस वातावरण शुद्ध करणारी असते म्हणूनच सकाळी तुळशीला प्रदक्षिणा केल्याने फायदा होतो.

कॅन्सरवर पुदिना, तुळस गुणकारी!जंतुघ्न असल्याने खाज सुटणे त्वचाविकार यावर पानांचा लेप लावल्यास फायदा होतो. पानांचा रस नाकात सोडल्यास शिरोरोग कमी होतात. कान दुखत असल्यास पानांचा रस कानामधे टाकल्यास कर्णशूल थांबतो. मच्छर किटक यांना दूर ठेवण्याचे काम तुळस करते. डोक्यात ऊवा लिखा झाल्या असल्यास तुळशी पानांचा रस अथवा तुळशीची पाने तेलात उकळवून तेलाने केसांच्या मुळाशी मालीश केल्याने ऊवा नष्ट होतात. सर्दी खोकला अशा श्वसन संस्थेच्या विकारांवर तुळस खूपच उपयुक्त आहे.

कोरडा खोकला असल्यास तुळशीचा काढा उपयोगी ठरतो. वातावरणातील बदलामुळे घसा बसणे अथवा घसा खवखवणे असे त्रास उद्भवतात यावर तुळस हळद सैंधव गरम पाण्यात टाकून गुळण्या केल्यास लाभ होतो. तुळशीच्या पानांचा रस मधासह घेतल्यास सर्दी खोकला यावर आराम पडतो. थंडी वाजून ताप येणे सर्दी यावर तुळस खूप उपयोगी आहे. काळे मिरे व तुळस एकत्र करून मधासह चाटण ज्वर सर्दी कमी करते.

तुळशीची पाने वाळवून त्याचे चूर्ण तपकीर प्रमाणे नाकाने ओढल्यास सर्दीमुळे नाक बंद असणे, नाक चोंदलेले असणे, डोके जड पडणे कमी होते. तुळस विष कमी करणारी आहे. जेवणानंतर तुळशीची पाने खाल्ल्यास मुखदुर्गंधी कमी करणारी कृमीनाशक कार्य करते.

तुळस रक्त शुद्ध करणारी आहे. म्हणूनच तुळशीची पाने खाल्याने रक्त शुद्ध होते. चेहऱ्याच्या त्वचेसाठी सुद्धा तुळशीच्या पानांचा खूप लाभ होतो. तुळशीची पाने पाण्यात टाकून वाफ घेणे किंवा रसांचा लेप लावणे यामुळे चेहरा तजेलदार व स्वच्छ होतो.

तुळस त्वक् दोषहर असल्याने चेहऱ्यावर पुरळं येणे किंवा पिंपल्ससाठी तुळशीचा लेप फायदेशीर ठरतो. तुळशीबीज मूत्र विकारांवर उपयोगी आहे. या बीया दौर्बल्य कमी करणाऱ्या असतात. चहाऐवजी तुळशीचा काढा सकाळी घेतल्यास जास्त उपयोगी व सकाळच्या वेळी जो कफ वाढलेला असतो तो कमी करणारा आहे. म्हणूनच चहा ऐवजी आपली गुणकारी तुळस जास्त फायदेशीर आयुष्य वाढविणारी आहे.

तुळशी कफ सिरप, अर्क, तेल अनेक स्वरूपात उपलब्ध असते. पण प्रत्येक दारातील ही ताजी तुळशीची पाने रोजच्या सेवनात असेल तर आजार नक्कीच दाराबाहेर राहतील.

ह्या बातम्या पण वाचा 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER