काँग्रेस-शिवसेनेने किती स्वैराचार करावा हाच मूळ प्रश्न- प्रवीण दरेकर

Praveen Darekar

मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी पुन्हा एकदा काँग्रेस-शिवसेनेवर (Congress-Shiv Sena) जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिकेच्या (BMC) स्थायी समितीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. मात्र सत्तेसाठी एकमेकांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांनी किती स्वैराचार करावा हाच मूळ प्रश्न असल्याचा घणाघात प्रवीण दरेकर यांनी केला. राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेनेच्या अशा दुटप्पी वागण्यामुळे महाराष्ट्रातील जनता वैतागली असल्याचे ते म्हणाले.

प्रवीण दरेकर म्हणाले, मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसाठी काँग्रेस आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. मात्र, सत्तेसाठी राज्यात एकमेकांसोबत आहेत हे काही पटत नाही. किती स्वैराचार करायचा हाच मूळ प्रश्न आहे. महाविकास आघाडीत मतभिन्नता आहेत. एकमेकांविरोधात मतदान केलं, तर निकाल विरोधात लागू शकतो. हे सरकार अंतर्गत विरोधाने पडेल असं वाटतं. महाराष्ट्राची जनता यांच्या अशा वागण्याने वैतागली आहे. त्यांच्यात एकमताने निर्णय झालाय असा एक दिवस तरी सांगा? असा प्रश्नही दरेकरांनी उपस्थित केला.

बीडमधील मराठा युवकाच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया देताना त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. ते म्हणाले, मी बीडला जाणार आहे. बीडमध्ये आत्महत्या केलेल्या विवेक रहाडे या तरुणाच्या घरच्यांची भेट घेणार आहे. सरकार उदासीन आहे. मराठा तरुणांचा मूक मोर्चा पाहिला. मग आता सरकार काय ठोक मोर्चा पाहू इच्छिते का? या समाजाला तात्पुरता काय दिलासा देता येईल याचा विचार सरकारने करायला हवा. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

उत्तरप्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, मी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता आहे. इथले अनेक मुद्दे आम्ही मांडले. हाथरस येथे जे घडले  ते दुर्दैवी आहे. जे घडले  त्याबद्दल सत्ताधारी गृहमंत्री काही बोलत नाहीत. महाराष्ट्रात ज्या बलात्काराच्या घटना घडतायत त्यावर बोलत नाहीत.

आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही कुठली मानसिकता आहे? महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात बलात्काराच्या घटना घडल्या. त्या ठिकाणी संजय राऊत गेले का कधी? आता म्हणतात उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लावा. ना प्रतिक्रिया ना भेट, केवळ राजकारण करण्यासाठी यांना वेळ आहे. त्यांना लोकांच्या समस्यांशी काही घेणंदेणं नाही. जनतेला ठाऊक आहे की, राजकारण कोण करतंय, काम कोण करतंय, असा टोलाही त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER