बार्टीच्या पराभवानंतर ‘टाईम आऊट’वरून टेनिस जगतात वादळ

महिलांचे आंतरराष्ट्रीय टेनिस (Women Tennis) अतिशय स्पर्धात्मक झाले आहे आणि एकाच खेळाडूने वर्चस्व गाजविण्याचे दिवस गेल्या पाच वर्षांत संपले आहे. जवळपास प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धेत वेगळीच आणि अनपेक्षित विजेती समोर येत आहे. विद्यमान नंबर वन ऑस्ट्रेलियाची अॕश्ली बार्टी (Ashley Barty) हिचा ऑस्ट्रेलियन ओपनमधील (Australian,Open 2021)पराभव हे ताजे उदाहरण आहे.

कारकिर्दीत पहिल्यांदाच ग्रँड स्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहचलेल्या झेक गणराज्याच्या कॅरोलिना मुचोव्हा (Karolina Muchova) हिने तिला १-६, ०-२ अशा पीछाडीवरून मात दिली. मुचोव्हाचा हा विजय जेवढा धक्कादायक तेवढाच वादग्रस्तसुद्धा ठरलाय; कारण तिने या सामन्यात घेतलेल्या मेडिकल टाईम आऊटचे (Medical Timeout).

दुसऱ्या सेटमध्ये १-६, १-२ अशा स्थितीत मुचोव्हाने आपल्याला चक्रावल्यासारखे होत असल्याचे आणि हात बधिर झाला असल्याची तक्रार केली. त्यानंतर वैद्यकीय पथकाने तिची नाडी तपासली, रक्तदाब मोजला आणि नंतर ते तिला मैदानाबाहेर घेऊन गेले. त्यानंतर तब्बल १० मिनिटांनी मुचोव्हा मैदानावर परतली आणि या लांबलचक व्यत्ययानेच बहुधा अॕश्ली बार्टीची खेळाची लय बिघडली आणि ६-१, २-१ अशा स्थितीतूनही तिने सामना गमावला. पुढचे नऊपैकी आठ गेम तिने गमावले आणि वेड्यावाकड्या फटक्यांपायी चार वेळा सर्व्हिस गमावली, तब्बल सात ब्रेक पॉइंट तिने वाया घालवले तर दुसरीकडे या ब्रेकनंतर मुचोव्हाच्या खेळात लक्षणीय सुधारणा दिसून आली.

ह्यामुळे टेनिसमध्ये नव्या वादाला तोंड फुटले असून मेडिकल टाईम आऊटचा खेळाडू आपल्या सोयीने उपयोग करून घेत आहे का? मुचोव्हाची प्रकृती खरोखरच बिघडली होती का? आणि बिघडली असेल तर १० मिनिटानंतर ती एवढी चांगली कशी खेळली? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि या संशयावरून बार्टीच्या चाहत्यांचा संताप झाला आहे तर काही टेनिसपटू व पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

स्वतः बार्टीने मात्र समंजसपणा व मोठी खेळाडूवृत्ती दाखवून मुचोव्हाला दोष देण्यापेक्षा अतिशय संतुलित प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, दुसऱ्या सेटमध्ये मला काही संधी होत्या; पण मी स्वतःला सावरू शकले नाही. आणि तिसऱ्या सेटमध्ये मी हवा तसा खेळ करू शकले नाही. मला वाटते की, भरकटले आणि हे निश्चितपणे निराशाजनक होते. मेडिकल टाईम आऊटबद्दल बोलायचे तर ते नियमबाह्य असते तर डॉक्टर व फिजिओंनीच नकार दिला असता. गरजेनुसार खेळातच मेडिकल टाईम आउटची तरतूद आहे. मला वाटते तिला त्याची गरज होती. त्यामुळे तिने जी काही मदत घेतली ती नियमाला धरूनच होती. त्यात चुकीचे काही नव्हते.

टाईम आऊटचे नियम बदलायला हवे का, या प्रश्नाच्या उत्तरात बार्टी म्हणाली की, नियम मी बनवत नाही; पण मी त्याचे पालन करते. तिला दुखापत होती की नाही या विषयावर मी बोलणे योग्य नाही.

बार्टीचा पराभव हा १९७८ नंतरची पहिली स्थानिक खेळाड ऑस्ट्रेलियन ओपनची विजेती ठरण्याकडे डोळा लावून बसलेल्या चाहत्यांसाठी फार मोठा धक्का होता; कारण एक तर नंबर वनला अगदी स्वप्नवत असा सोपा ड्राॕ मिळालेला होता. त्यात माजी विजेती सोफिया केनिन, नंबर पाच स्वितोलिना व नंबर सहा प्लिस्कोव्हा यांच्या पराभवाने तिचा मार्ग अधिकच सोपा झाला होता. आता या हाफमध्ये २२ वी मानांकित जेनिफर ब्रॕडी ही आव्हान टिकवून ठेवलेली सर्वोच्च मानांकित खेळाडू आहे. यावरून याची कल्पना येते.

अॕश बार्टीने अतिशय समंजस प्रतिक्रिया दिली असली तरी तिच्या चाहत्यांचा मात्र संताप झालेला आहे. या स्पर्धेत मुचोव्हाची सुरुवातीपासून पोटाची तक्रार आहे. मेलबोर्नमध्ये सामने खेळताना ती बहुतेकदा अस्वस्थ दिसली आहे; पण बार्टीविरुद्ध सामन्यात ब्रेकनंतर ती अतिशय ताजीतवानी दिसली आणि सहाव्या मानांकित प्लिस्कोव्हा व १८ व्या मानांकित मर्टेन्सवरील विजय हे फ्ल्यूक नव्हते हे तिने दाखवून दिले.

माजी ऑस्ट्रेलियन टेनिसपटू कॕसी डेलाक्वा म्हणाली की, मेडिकल टाईम आउट नियमानुसारच असला तरी काही प्रश्न नक्कीच निर्माण झाले आहेत. ती म्हणाली की, तिला चक्कर आल्यासारखे होतेय आणि त्यानंतर ती फारच छान खेळली. हे काहीसे अविश्वसनीय होते. टाईम आउट नियमाने योग्य असला तरी तात्त्विकदृष्ट्या योग्य आहे का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER