सातू – अनेक गुणयुक्त पारंपारिक पदार्थ !

Barley - सातू

काही पारंपरिक पदार्थ घरी बनविणे, सेवन करणे, त्या पदार्थाचे माहात्म्य अजूनही टिकून आहे. ऋतूनुसार हे पदार्थ घरी बनविल्या किंवा बनवून घेतल्या जातात. घरातील मंडळींना आवर्जून दिल्या जातात. तसाच एक पदार्थ आहे, सातूचे पीठ. उन्हाळा सुरू झाला की सातूचे पीठ सेवन केल्या जाते. सातूचे पीठ पचायला हलके असते. सातूचे पीठ दूध किंवा पाण्यात मिसळून साखर किंवा गुळ घालून पातळ अवलेहाप्रमाणे घेतल्या जाते.

उन्हाळ्यात उष्णतेमुळे अशक्तपणा, भूक न लागणे / मंदावणे, थंड हलके पातळ खाण्याची इच्छा होणे हे अनुभवयास मिळते. सातूचे हे मिश्रण या ऋतूत उत्तम पर्याय आहे.

सातूचे पीठ गहू, डाळ्या, बोर, यव इत्यादी धान्य भाजून पीठ केले जाते. यात जंगली किंवा गावरान बोराची पावडर टाकल्यास आंबट रसाने हृदयाला शक्ती  देणारे, तहान, थकवा, ग्लानी यांचा नाश करणारे असते. या पीठात जे धान्य वापरू त्यानुसार गुण बदलतात.

आयुर्वेद (Ayurveda) ग्रंथात सातूच्या पीठाचे वर्णन केले आहे. इतका प्राचीन इतिहास असणारा हा पदार्थ आहे. आ. वाग्भटांनी सातूचे वर्णन करताना म्हटले आहे :

सक्तवो लघवः क्षुत्तृट्श्रमनेत्रामयव्रणान् ।
घ्नन्ति सन्तर्पणाः पानात्सद्य एव बलप्रदा: ॥

सर्व प्रकारचे सातूचे पीठ हे पचायला हलके, भूक, तहान, थकवा यांचे शमन करणारे, नेत्ररोग, व्रण या व्याधी नष्ट करणारे, तत्काळ तृप्ती देणारे व बलकारक आहे. एवढे गुण या सातूच्या पिठात असतात.

सातूचे पीठ घेताना काही नियम पण सांगितले आहेत तेदेखील महत्त्वाचे आहेत :

Satu१) सातूचे पीठ पाणी किंवा दूध इत्यादी द्रवपदार्थात मिसळल्याशिवाय खाऊ
नये. नुसते सातूचे पीठ खाऊ नये.
२) सातूचे द्रव घेत असताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नये.
३) दिवसातून एकदाच  सातूचे पीठ घ्यावे. रात्री सातू खाऊ नये.
४) जेवण झाल्यानंतर सातू खाऊ नये.
५) सातूचे लाडू करून खाऊ नये. हे पातळ अवलेहाप्रमाणेच असावे.
६) पुष्कळ मात्रेत सातू खाऊ नये.

उपरोक्त नियम पाळून सातूचे पीठ घेतल्यास उन्हाळ्यात त्वरित ऊर्जा देणारा हा पदार्थ न्याहारीला उत्तम पर्याय आहे. सतत तहान लागणे, पाणी पिऊनही समाधान न होणे या ग्रीष्मातील त्रासावर सातू लाभकारक आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना हितकर बलदायक आहार हा ठरू शकतो. प्रवासाला जाताना हे सातूचे पीठ सहज करता येईल असा पौष्टिक  पदार्थ आहे. म्हणूनच उन्हाळ्यात सातूच्या या गुणांचा, त्याच्या नियमांचे पालन करून नक्कीच सेवन करावे.

ह्या बातम्या पण वाचा : 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button