‘छत्रपती संभाजी महाराज मार्ग’चे बॅनर फाडले; साताऱ्यात तणाव

- उदयनराजेंनी केले होते उद्घाटन

- Banner of 'Chhatrapati Sambhaji Maharaj Marga' torn, tension in Satara

मुंबई : सातारा शहरातील पोवई नाक्यावरील ग्रेड सेपरेटरचे शुक्रवारी (९ जानेवारीला) खासदार उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosale) यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या मार्गाच्या  तीनही प्रवेशद्वारांना छत्रपतींची नावे देण्यात आली आहेत. यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा (Chhatrapati Sambhaji Maharaj Marga) फलक समाजकंटकाने फाडला. शनिवारी सकाळी हे निदर्शनास आले. त्यामुळे खळबळ उडाली. उदयनराजे समर्थक मोठ्या संख्येत घटनास्थळी जमा झाले. साताऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कार्यकर्ते व नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन झाले. या तीन भुयारी मार्गांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज भुयारी मार्ग, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग आणि श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज भुयारी मार्ग असे नामकरण करण्यात आले आहे.

आज सकाळी छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्ग हा फलक अज्ञाताने फाडल्याचे दिसले. ही माहिती समजताच पोवई नाक्यावर खासदार उदयनराजे समर्थक गोळा होऊ लागले. पोलिसांनी फाडलेला फलक काढून ताब्यात घेतला.

त्यानंतर उदयनराजे समर्थक ॲड. दत्तात्रेय बनकर, संग्राम बर्गे, सातारा विकास आघाडीचे नगरसेवक व कार्यकर्ते यांनी केवळ संभाजी महाराजांविषयीच असे का घडते, या घटनेमागे कोण आहेत याचा पोलिसांनी शोध घ्यावा, संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आम्हाला आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा दिला. पोलिसांनी त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. कारवाई करू, असे सांगितले. कार्यकर्ते आणि पोलीस अधिकाऱ्यांत बराच वेळ चर्चा सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER