दार उघड उद्धवा दार उघड : मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलन

Kolhapur

कोल्हापूर : राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले. यावेळी दार उघड उद्धवा दार उघड, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. महाराष्ट्रातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे दर्शनासाठी भक्तांना खुली करावीत, या मागणीसाठी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शनिवारी राज्यभर घंटानाद आंदोलन झाले. त्याअंतर्गत कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या प्रवेशद्वारातही घंटानाद आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विविध हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जनजीवन पूर्ववत् करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मॉल, दारुची दुकाने ‘पूनःश्च हरी ओम’ च्या नावाखाली सर्व काही चालू केले. लहान-मोठी व्यापाऱ्यांची दुकाने, केश कर्तनालये इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी लोकांची भाजी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होत असते अशी मंडई देखील सुरू झाली आहे. मात्र संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ‘हरी’ ला मात्र बंदिस्त ठेवले आहे. गेली पाच महिने मंदिरे बंद असल्यामुळे अनेक लोकांची मानसिकता बिघडली आहे.

मंदिरामध्ये येणारा भाविक हा स्वतः स्वच्छतेचे भान ठेवूनच मंदिरामध्ये प्रवेश करत असतो. मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांच्या कुटुंबीयांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्याचा विचार सरकार करणार आहे की नाही? सामाजिक अंतर पाळून आवश्यक नियम, अटी शर्तीसह देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करण्याची तसेच भजन, कीर्तन व पूजन करण्याची आग्रही मागणी भाविक भक्तांतून होत आहे. मात्र हरीलाच बंदिस्त करून राज्य सरकार कुंभकर्णी अवस्थेत गेले असल्याची टीका आंदोलकांनी यानिमित्ताने केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER