या कुटुंबाने जाहीर केलीय तब्बल 2 लाख कोटींची संपत्ती

मुंबई : तब्बल २ लाख कोटी रुपयांची संपत्ती मुंबईमधील एका कुटुंबाने जाहीर केली आहे. आपल्याकडे २ लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे मुंबईतील वांद्रे परिसरात राहणा-या अब्दुल रज्जाक मोहम्मद सय्यद आणि त्यांच्या कुटुंबाने जाहीर केले आहे. या कुटुंबात एकूण चार सदस्य आहेत. सरकारच्या इन्कम डिस्क्लोजर स्कीमअंतर्गत अब्दुल रज्जाक मोहम्मद सय्यद यांनी आयकर विभागाला आपल्याकडील २ लाख कोटी रुपयांची माहिती दिली आहे. कमवण्याचे मर्यादित स्त्रोत असताना एका कुटुंबाकडे एवढी संपत्ती आली कशी असा प्रश्न आयकर विभागाने उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आयकर विभागाने आपली चौकशी सुरु केली आहे.

चार कुटुंबियांच्या या परिवारात अब्दुल रज्जाक मोहम्मद सय्यद, मोहम्मद आरिफ अब्दुल रज्जाक सईद (मुलगा), रुखसाना अब्दुल रज्जक सय्यद (पत्नी) आणि नुरजहा मोहम्मद सईद (मुलगी) यांचा समावेश आहे. हा परिवार मुंबईतील वांद्रे परिसरात राहत असुन चौघांपैकी तिघांच्या पॅनकार्डवर अजमेर येथील पत्ता आहे. हे कुटुंब सप्टेंबर महिन्यात मुंबईत आले आणि त्यानंतर त्यांनी या संपत्तीची घोषणा केली आहे.

इन्कम डिस्क्लोजर स्कीम अंतर्गत त्यांनी आपल्याकडील २ लाख कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. या स्कीम अंतर्गत बेहिशेबी संपत्ती जाहीर करणा-यांना ४५% रक्कम टॅक्स म्हणून भरावी लागते तर इतर सरचार्ज आणि पेनल्टी म्हणून भरावी लागते. या स्कीम अंतर्गत बेहिशेबी संपत्ती जाहीर करण्याची अंतिम तारिख ३० सप्टेंबर होती. या स्किम अंतर्गत ६५,२५० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे तर सय्यद कुटुंबियांनी जाहीर केलेली संपत्ती या रक्कमेच्या तीनपट आहे.

दुसऱ्यांची काळी संपत्ती लपवण्यासाठी सय्यद कुटुंबियांचा वापर करण्यात आल्याचा आयकर विभागाला संशय आहे.