परीक्षाकाळात मशिदीवरील भोंगे बंद ठेवा; युवासेनेची मागणी

yuva-sena-nagpur

नागपूर :  सध्या राज्यात बारावीच्या परीक्षेला सुरुवात झालेली असून, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दहावीच्या परीक्षेलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये यासाठी दहावी आणि बारावीतील परीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद ठेवा, अशी मागणी नागपूर युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केली आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन देत ही मागणी केली.

बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. तसेच दहावीची परीक्षाही लवकरच सुरू होणार असल्याने विद्यार्थीही परीक्षेची तयारी करत आहेत. मशिदीवरील भोंग्यामुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे परीक्षेच्या काळात मशिदीवरील भोंगे बंद ठेवा, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. युवासेनेचे कार्यकर्ते यासंबंधी    गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही ते भेट घेणार आहेत. या भोंग्यांच्या आवाजामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे.

“युवासेना सातत्याने विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करत आहे. सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षेच्या काळात जेव्हा आमचा विद्यार्थी सकाळी उठून अभ्यास करतो. अभ्यास करताना परिसरात आजूबाजूला मशिदीवर जे भोंगे लागले आहेत. त्या भोंग्याच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचण येते. त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत आहे. हे भोंगे परीक्षेच्या काळात बंद राहावेत. यामध्ये जाती- धर्माचा कुठेही संबंध नाही. आमचे मुस्लिम विद्यार्थी आहेत त्यांनीही हे भोंगे बंद करायला सांगितले आहेत. ” असे युवासेना प्रमुख विक्रम राठोड यांनी सांगितले.