हवेचे प्रदूषण जास्त असलेल्या सर्व शहरांमध्ये फटाक्यांवर बंदी

इतर ठिकाणी ‘हरित फटाक्या’साठी फक्त दोन तास

Air Pollution - Firecrackers Banned

नवी दिल्ली : जेथील हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कायद्याने ठरवून दिलेल्या कमाल मर्यादेहून जास्त आणि खूप जास्त (Poor and more Average Abient Air Quality) आहे अशा देशभरातील सर्व शहरांमध्ये या महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व प्रकारच्या फटाक्यांंची विक्री करण्यास आणि ते वाजविण्यास बंदी करणारा आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (National Green Tribunal) सोमवारी दिला. ही बंदी सोमवार ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होऊन ३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील.

तसेच ज्या शहरांमध्ये हवेचे प्रदूषण मध्यम किंवा त्याहून कमी ( Moderate and less Average Abient Air Quality) आहे तेथे दिवाळीत फक्त रात्री ८ ते १० असे दोनच तास फटाके वाजविता येतील, असाही आदेश न्यायाधिकरणाने दिला आहे. ज्याने हवेचे प्रदूषण कमी होते अशा ‘हरित फटाक्यां’साठीच (Green Firecrackers) ही मुभा आहे. राज्यांना याहून अधिक कडक बंदी आदेश काढायचे असतील तर ती तसे आदेश काढू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले.

आताच्या नोव्हेंबर महिन्याची हवेच्या प्रदूषणाची ताजी आकडेवारी उपलब्ध असल्याने वरीलप्रमाणे कोणत्या शहरांत संपूर्ण बंदी व कोणत्या शहरांमध्ये अंशत: बंदी लागू होईल हे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या आकडेवारीवरून ठरवावे, असे न्यायाधिकरणाने सांगितले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने देशातील ज्या १२२ शहरांचे वर्गीकरण ‘एरवीही हवेचे प्रदूषण जास्त असलेली शहरे’ (Containment Cities) असे केले आहे त्या शहरांमध्येही ही संपूर्ण बंदी लागू होईल, असे न्यायाधिकरणाने नमूद केले आहे. अशा शहरांमध्ये महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, औरंगाबाद, बदलापूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, बृहन्मुबई, नागपूर, नाशिक, नवी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर, ठाणे व उल्हासनगर या १८ शहरांचा समावेश आहे.

न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्या. ए. के. गोयल, न्यायिक सदस्य न्या. एस. के. सिंग आणि डॉ. एस. एस. गरब्याल आणि डॉ. नगिन नंदा या तज्ज्ञ सदस्यांच्या न्यायपीठाने हा आदेश दिला. दिवाळीत फटाक्यांमुळे आणखी प्रदूषण होऊन कोरोना महामारीचा जोर वाढू नये यासाठी न्यायाधिकरणाने हे पाऊल उचलले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राज्यांचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांवर सोपविण्यात आली आहे.

तूर्तास हा आदेश फक्त नोव्हेंबर महिन्यापुरता दिला असला तरी तो त्यापुढेही सुरू ठेवायचा की नाही, याचा नंतर विचार केला जाणार आहे. बंदी नंतरही सुरू राहिली तर नाताळ व ३१ डिसेंबरला रात्री ११.५५ ते १२.३० या वेळातच फटाके वाजविता येतील, असेही न्यायाधिकरणाने सांगितले.

सुरुवातीस न्यायाधिकरणापुढे फक्त दिल्ली राजधानी परिक्षेत्रातील प्रदूषण व फटाकेबंदीचा विषय होता. दरम्यान, कोरोनाचे कारण देत काही राज्यांनी फटाकेबंदीचे आदेश काढले. त्यामुळे न्यायाधिकरणाने सुनावणीची व्याप्ती देशव्यापी केली व सर्व राज्यांना नोटीस काढली. त्यानुसार शुक्रवारी सुनावणी झाली तेव्हा जेमतेम तीन-चार राज्येच हजर होती. परंतु हा विषय तातडीचा आहे, असे म्हणत सरसकट आदेश दिला गेला.

…तर मृत्यूचा उत्सव साजरा होईल
फटाके उत्पादक संघटनेने आणि फटाक्यांचे सर्वाधिक कारखाने जेथे आहेत त्या तामिळनाडू सरकारनेही अशा सरसकट बंदीस विरोध केला. याने लाखो लोकांच्या पोटावर पाय येईल, असे त्यांचे म्हणणे होते. परंतु न्यायालयाने म्हटले की, जेव्हा काही जणांचे पोट भरणे इतर अनेकांच्या जीवावर उठण्याची शक्यता असते तेव्हा हा मुद्दा गैरलागू ठरतो. फटाके वाजवून आनंद साजरा केला जातो. बंदी घातली नाही तर फटाके वाजवून मृत्यूचा उत्सव साजरा केल्यासारखे होईल, असेही न्यायाधिकरणाने म्हटले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER