बाळासाहेबांचा पुतळा, फडणवीसांचे ट्विट अन् राज-प्रसाद लाड यांची भेट

prasad lad -Raj Thackeray - Balasaheb Thackeray - Devendra Fadnavis

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शनिवारी थाटामाटात झाले. फोर्ट या मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी हा पुतळा उभारला गेला आहे. ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’, या वाक्यानं बाळासाहेबांचे जोशपूर्ण भाषण सुरू होत असे. ते वाक्य उच्चारताना ते दोन्ही हात हवेत करून जनसमुदायाला अभिवादन करत. त्यावेळची भावमुद्रा म्हणजे हा पुतळा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अशा दिग्गजांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा संपन्न झाला. उद्धव ठाकरे हे राज यांच्याशी काही मिनिटे बोलले. सौ रश्मी ठाकरेही तेवढ्या गर्दीत राज यांच्याजवळ येऊन बोलताना दिसल्या. सोबत आदित्य ठाकरेदेखील होते.

बाळासाहेबांच्या ९५ व्या जयंतीचे औचित्य साधून हा समारंभ झाला. पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय नेते या ठिकाणी आले होते. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची सभ्यता दर्शविणारा हा समारंभ होता. यावेळी भाषणबाजी मात्र झाली नाही. अन्यथा राजकीय कोट्यांनी हा समारंभ अधिकच अविस्मरणीय झाला असता.

शनिवारी दिवसभरातील दोन घटनांनी लक्ष वेधून घेतले. पहिले म्हणजे बाळासाहेबांना आदरांजली अर्पण करताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडीओ रिलिज झाला. त्यात त्यांनी शिवसेनेला कानपिचक्या दिल्या आणि तेही बाळासाहेबांच्या भाषणातील काही वाक्यांचा उल्लेख करून. बाळासाहेबांच्या भाषणातील काही वाक्यांचा व्हिडीओच त्यात आहे. ‘मी फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे. ज्या जनतेनं निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता; पैशांकरता. भांडण काय तुमचं, खुर्चीचं? छे, छे खुर्चीसाठी भांडायचं नाही. पैशांसाठी लाचार व्हाल तर भगवा झेंडा हाती घेऊ नका. हे दोष तुमच्या मराठ्यांच्या रक्तात असता कामा नये हे लक्षात ठेवा, असे आवाहन बाळासाहेब करीत असल्याचे या व्हिडीओत आहे. बाळासाहेबांच्या त्या वाक्यांची आठवण करून देत फडणवीस यांनी सत्तेसाठी भाजपशी काडीमोड करून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाणाºया शिवसेनेला टोला हाणला आहे. त्यावर, अर्थातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ‘राजकारणात एखादी भूमिका घेतली (काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाणे) म्हणजे लगेच बाळाासाहेबांच्या भूमिकेला छेद गेला असा त्याचा अर्थ होत नाही’, असे राऊत म्हणाले.

आणखी एक घटना म्हणजे भाजपचे विधान परिषद सदस्य प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी कृष्णकुंजवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतलेली भेट. पाऊणतास त्यांनी राज यांच्याशी चर्चा केली. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणार आहे. या निवडणुकीत भाजप-मनसे युती होणार या बाबत जोरदार उत्सुकता आहे. राज यांच्याशी भेटीसाठी लाड यांनी बाळासाहेबांच्या जयंतीचा मुहूर्त निवडला. आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही असे सांगतानाच त्यांनी, शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी भाजप शक्य ते सगळे करेल असे सूचक उदगार या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना लाड यांनी काढले. काही गौप्यस्फोट नजीकच्या काळात होणार आहे का या पत्रकारांच्या प्रश्नात त्यांनी, ‘आगे आगे देखो होता है क्या’असे उत्तर देऊन सस्पेन्स कायम ठेवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER