आशिष शेलारांची विनंती, बाळासाहेब थोरातांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

Savarkar tribute

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज ५४वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पाहार घालून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विधीमंडळ परिसरात बाळासाहेब थोरातांसह भाजपा आमदार आशिष शेलार हेदेखील उपस्थित होते त्यानंतर शेलार यांच्या विनंतीनंतर विधीमंडळात ठेवलेल्या सावरकरांच्या प्रतिमेवर थोरातांनी पुष्पांजली वाहिली.

दरम्यान, विधीमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी आज दोन्ही सभागृहांमध्ये स्वातंत्र्यावीर सावरकरांचा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे. भाजपा सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव आणून शिवसेनेची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीवरुन शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट नाही, सत्तेत भागीदारी असलेल्या काँग्रेसची नाराजी शिवसेनेला घ्यायची नाही. काँग्रेसने वीर सावरकरांबद्दल नेहमी अपमानास्पद शब्दांचा वापर केला आहे. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशी मागणी केली होती. ब्रिटिशांची माफी मागणाऱ्यांना भारतरत्न का द्यायचा असा सवाल काँग्रेसकडून विचारला जातो. त्यामुळे सावरकर मुद्द्यावरुन शिवसेना-काँग्रेस यांच्यात मतभेद आहेत.

महाराष्ट्रात काँग्रेसने छापलेल्या मासिकात सावरकरांचा अपमान केला आहे असा आरोप भाजपाने केला. या मासिकाने सावरकरांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे काँग्रेसने माफी मागावी अशी मागणी अलीकडेच भाजपाने केली होती. मात्र या मुद्द्यावर शिवसेनेनं भाष्य करणं टाळले .

भाजपाकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न; आज सावरकरांचा गौरव ठराव मांडणार