देशाच लसीकरण झालं नसताना लस निर्यात करणं हा केंद्र सरकारचा दांभिकपणा – थोरात

Balasaheb Thorat-pm modi

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून काँग्रेस (Congress) नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केंद्र सरकारचे कान टोचले आहे. कोरोना रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला (Supreme court) टास्क फोर्स नेमावी लागत आहे, मग केंद्र सरकार करतंय काय?, असा संतप्त सवाल करत, देशात लसीकरण शिल्लक असताना लस निर्यात करणं हा केंद्र सरकारचा दांभिकपणा होय, अशी खरमरीत टीका बाळासाहेब थोरात यांनी केंद्र सरकारवर (Central Govt) केली.

बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारकडे कुठलंही ठोस धोरण नाही. नियोजन नाही. सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करून कोरोना रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी लागते. मग केंद्र सरकार करतंय काय?, असा सवाल थोरात यांनी केला. कोरोनाची संपूर्ण जबाबदारी घेऊन योजना आखायला कोर्टाला सांगावं लागत. पण केंद्र जबाबदारी घेण्यास तयार नाही. सर्व जबाबदाऱ्या राज्य सरकारांवर ढकलून देत आहेत. आज देशात जी परिस्थिती उद्भवली आहे, त्याला केंद्र सरकारच जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

देशात कोरोनाचा उद्रेक वाढत असताना कुंभमेळा आणि निवडणुका घेण्यात आल्या. त्यामुळे कोरोनाचा स्फोट झाला. त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. आता त्याचा परिणाम संपूर्ण देश भोगत आहे. असं सांगतानाच देशाचं लसीकरण होण्याआधीच लस निर्यात करणं हा केंद्र सरकारचा दांभिकपणा होता, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा शाश्वत उपाय आहे. त्यातून तिसरी लाट रोखली जाऊ शकते. अनेक मृत्यू रोखले जाऊ शकतात. हजारो कुटुंबाचे मानसिक त्रास कमी केले जाऊ शकतात. पण केंद्र सरकार लस देत नाही. लस देण्यासाठी केंद्राकडे नियोजन नाही. केंद्र सरकार निष्क्रीय आहे. केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील व्यक्तिंना लस देण्याची जबाबदारी राज्यांवर सोपवली. राज्यांनी ही जबाबदारी घेतली. पण केंद्राने लशींचा पुरवठा केलाच नाही. महाराष्ट्राला केवळ अडीच लाख डोसउपलब्ध करुन देण्यात आले. त्याने काय होणार आहे? असा सवाल करतानाच कोविन ॲपमध्येही तांत्रिक घोळ सुरूच आहे. केंद्र सरकारने राज्यांना लसींचा साठा देऊन त्याचं नियोजन करायला सांगावं, अशी अपेक्षा होती. पण केंद्र त्यातही लक्ष देत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button