हे कशाच्या आधारे भविष्यवाणी करतात मला समजलंच नाही; थोरातांचा राज ठाकरेंना टोला

Raj Thackeray & Balasaheb Thorat

मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे (Shivsena) यांच्या नेतृत्वाखाली तीन पक्षांचं सरकार आलं होतं. तेव्हाच मी सांगितलं होतं, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकीत मनसेचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं होतं. त्यावर आता राज्याचे महसूलमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी राज ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

‘हे कशाच्या आधारे भविष्यवाणी करतात हे मला काही समजलेलं नाही. फार कमी कालखंड आम्हाला मिळाला आहे. त्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असतानाही आघाडी सरकारचं काम पाहिलं, तर ते निश्चितच चांगलं आहे. कामांची यादी पाहिली तर खूप मोठी आहे आणि किमान समान कार्यक्रम आम्ही राबवत आहोत.” असे थोरात म्हणाले. “मला माहिती नाही ते सरकार टिकणार नाही हे कशाच्या आधारावर म्हणत आहेत, पण मी सांगतो हे सरकार टिकणार आणि आपला पाच वर्षं कार्यकाळ पूर्ण करणार आणि १०० टक्के चांगलं काम करणार.

” असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तसेच ‘हे लिव्ह इन रिलेशनशिपचं सरकार आहे. आम्ही पाडायची गरज नाही, स्वतःहून पडेल’, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा त्यांनी जोरदार समाचार घेतला. भारतीय माणसाला आणि विशेषतः मराठी माणसाला लिव्ह इन रिलेशन काय असतं, हे माहितीही नाही. यांच्या मनात हे विचार येतातच कसे? हे कोणत्या संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात हा प्रश्न आहे. हा भारतीय संस्कृतीतला शब्द नाही. त्यांनी माहिती घ्यावी आणि या बाबतीत आत्मचिंतन करावं, असा सल्ला थोरातांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER