नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचेच नाव, शिवसेना आणि प्रकल्पग्रस्तांचे एकमत

Balasaheb Thackeray - Maharashtra Today

पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन चांगलाच वाद रंगला आहे. या विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या वादावरून मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणेंनी आपली भूमिका स्पष्ट केली. शिवसैनिकांनी विमानतळाला बाळासाहेबांचे नाव द्यावे यासाठी ठाम राहावे, असे आवाहन केल्याने स्थानिक प्रकल्पग्रस्त अन् शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नामकरणावरून निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे.

दि. बां. पाटलांबद्दल आम्हाला आदर आहेच, मात्र दि. बां. च्या नावावरून राजकीय पक्षांच्या राजकारणाला बळी न पडता स्थानिक प्रकल्पग्रस्त शिवसैनिक बाळासाहेबांच्या नावामागे ठाम पणे उभा राहणार असल्याचे मत पनवेल, नवी मुंबई आणि उरण परिसरातील स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, असा ठराव सिडकोमार्फत करण्यात आल्याने विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते, माजी खासदार दि. बां. पाटील यांचे नाव देण्यासाठी मागील काही वर्षांपासून आग्रही असलेले स्थानिक प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले आहेत.

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याच्या ठरावाविरोधात आक्रमक झालेल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये शिवसेनेविरोधात संताप निर्माण झाल्याने याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न शिवसेनेविरोधातील राजकीय पक्षांनी सुरू केला. तसेच शिवसेनेविरोधात वातावरण निर्माण केल्याने शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले स्थानिक प्रकल्पग्रस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोंडीत सापडले. शनिवारी खारघर वसाहतीत घेण्यात आलेल्या बैठकीत मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी नामकरणाविषयी सेनेची भूमिका स्पष्ट केल्यानंतर नामकरणावरून संभ्रमात असलेले सेना कार्यकर्त्यांमध्ये एकमत झालं. तसेच दि. बां. च्या मृत्यूनंतर पनवेल, उरण परिसरात दि. बां. चे उचित स्मारक देखील न उभारू शकलेले स्थानिक नेते बाळासाहेबांच्या नावावरून राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत शिवसेना पदाधिकारी प्रदीप ठाकूर यांनी व्यक्त केले.

दि. बां. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, याकरिता आक्रमक झालेल्या नेत्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. एखाद्या शैक्षणिक संस्थेला दि. बां. चे नाव देण्याचा विचार या नेत्यांच्या डोक्यात का आला नाही, अशी टीका सेनेचे विभागप्रमुख विश्वास पेठकर यांनी केली. नवी मुंबई, पनवेल आणि उरण परिसरात दिबांचे उचित स्मारक उभे करण्यात अपयशी ठरलेले नेते केवळ नामकरणावरून राजकारण करत असल्याचे मत सेना कार्यकर्ते पद्माकर पाटील यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याबाबत सेनेची भूमिका स्पष्ट असून, दि. बां. यांच्यापोटी असलेला आदर व्यक्त करूनच सेनेने आपली भूमिका स्पष्ट केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button