बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा…, भाजपाच्या विचाराशी सुसंगत आहे असे कधीच वाटले नाही – शरद पवार

Balasaheb Thackeray - Sharad Pawar
  • शरद पवार यांच्या मुलाखतीचा दुसरा टिझर रिलीज…
  • ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल की हेडमास्तर? शरद पवार सांगतात…

मुंबई : शिवसेनेचे खासदार व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीचा दुसरा टिझर रिलीज केला आहे.

महाविकास आघाडीची स्थापना शरद पवार यांच्या पुढाकारातून झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी महाविकास आघाडी सरकारचा रिमोट शरद पवार यांच्या हाती असल्याचे वारंवार बोलले जाते. याच प्रश्नाची उकल करणारा हा टिझर आहे.

संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली असून तीन भागात ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. दरम्यान त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरवर मुलाखतीचे टिझर शेअर केले आहेत. गुरुवारी सकाळी त्यांनी मुलाखतीचा एक टिझर शेअर केला असून यामध्ये त्यांनी शरद पवारांना ठाकरे सरकारचे आपण रिमोट कंट्रोल आहात की हेडमास्तर? असा प्रश्न विचारला आहे.

नव्या टिझरमध्ये शरद पवार महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेनेचं महत्त्वाचं योगदान होतं असं सांगत आहेत. तसंच मला जे बाळासाहेब ठाकरे माहिती आहेत, त्यांची विचारधारा, कामाची पद्धत ही भाजपाच्या विचाराशी सुसंगत होती असं कधीच वाटलं नाही असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं आहे. शिवाय तीन विचारांचे तीन पक्ष, पण सगळेजण एका विचाराने मुख्यमंत्र्यांच्या धोरणाच्या पाठिशी आहेत असंही ते सांगत आहेत.

एक शरद, सगळे गारद…! अशा मथळ्याखाली संजय राऊत यांनी ट्विटरला मुलाखतीचे टिझर प्रसिद्ध केले आहेत. ही मुलाखत तीन भागांमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे. लाखतीचा पहिला भाग ११ जुलै रोजी शिवसेनेच्या मुखपत्रातून आणि डिजिटल माध्यमाद्वारे प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यानंतर १२ आणि १३ जुलै रोजी मुलाखतीचा दुसरा आणि तिसरा भाग प्रसिद्ध होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER