बाळासाहेब विद्यार्थ्यांना म्हणाले होते, ‘… यासाठी इंग्रजी शिका!’

Balasaheb Thackeray had given a valuable advise to students

मुंबई : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून आज मराठी भाषा दिवस साजरा केला होत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनातही मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी चर्चा झाली. मराठी विरुद्ध इंग्रजी असा भाषिक वादही सातत्यानं ऐकायला मिळतो. मराठी आणि इंग्रजी या भाषिक वादावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एका कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोलाचा उपदेश दिला होता. गोष्ट आहे मार्च २००० सालची. षणमुखानंद सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्याला भाजपाचे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे हेसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बाळासाहेबांनी भाषेविषयी मौलिक मूलमंत्र दिला. बाळासाहेब म्हणाले, “तुम्ही उत्तम इग्रंजी बोला. आता एक विद्यार्थिनी इंग्रजी छान बोलली. त्याचबरोबर मातृभाषाही तुम्हाला विसरता येणार नाही. खरं सांगायचं तर अत्यंत गरजेचं आहे. इंग्रजी बोलाच, पण मराठीही शिका. जितक्या भाषा शिकता येतील तितक्या शिका. इंग्रजीचा द्वेष करून चालणार नाही.

इंग्रज गेले पण, इंग्रजी राहिली पाहिजे. इंग्रजी आलीच पाहिजे. आपल्या पोरांनी जो मार खाल्ला तो इंग्रजी येत नसल्यामुळे. ” असंही बाळासाहेबांनी यावेळी सांगितलं. बाळासाहेब म्हणाले, “जुनी गोष्ट आहे. एका पोराला प्रश्न विचारला, what is your Father name? ते म्हणालं, ‘माझा बाप काढू नको तुला सांगतो. कानाखाली आवाज काढेन.’ त्याला काय वाटलं बापाविषयीचे काहीतरी वाईट उद्गार काढले. म्हणून ते म्हणालं, कानाखाली आवाज काढेन. एव्हढं तरी.. मी फ्री प्रेसमध्ये असताना पहिलं कामं केलं की, तामिळ शिव्या शिकून घेतल्या. दिली तर कळलं पाहिजे. शिवी दिल्यानंतर थँक्यू व्हेरी मच करण्यात काय अर्थ आहे का? त्यामुळे प्रत्येक भाषेतील शिव्या शिका. ”

बाळासाहेबांनी असा सल्ला देताच उपस्थित विद्यार्थ्यांमधून हास्याचे कारंजे उडाले. “जर्मनीमध्ये जर्मन भाषेला खूप महत्त्व आहे. तिथं गेलं की, जर्मनमध्येच बोलावं लागतं. स्विझर्लंडचंही तसंच. नाही तर आपल्याकडं दूधवाला भय्या आला तरी पहिलं हिंदी आमचं. आणि हिंदी पण काय? आज दूध में पाणी जास्त लगता है?” असं सांगत बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या मराठी भाषेविषयीच्या भूमिकेलाही टोला लगावला होता.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू : मुख्यमंत्री