शिवजयंतीदिनी मुनगंटीवारांनी केले ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे’ उड्डाणपुलाचं उद्घाटन

Sudhir Mungantiwar

चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेनं भाजपाशी असलेली जुनी मैत्री तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. शिवसेनेनं घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपा-शिवसेना युती संपुष्टात आली. आणि आता तर भाजपा आणि शिवसेनेत विस्तवही जात नसल्याचे दिसून येत आहे. आणि अशातच चंद्रपुरात ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे’ उड्डाणपुलाचं भाजपाचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मात्र शिवसेनाप्रमुखांचं नाव देण्याचा युती पुन्हा जुळण्याशी काहीही संबंध नाही, एकत्र येऊ तेव्हा येऊ, आम्ही विचारांशी बांधील आहोत, असं मुनगंटीवारांनी स्पष्ट केलं.

चंद्रपूर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या जुना वरोरा नाका चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचं शिवजयंतीच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्यात आलं. ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूल’ असं याचं नामकरण करण्यात आलं. भाजपच्या ताब्यात असलेल्या चंद्रपूर महापालिकेने २०१२ मध्येच या संबंधी ठराव घेतला होता. त्याची अंमलबजावणी काल करण्यात आली. अत्यंत आकर्षक अशा सोहळ्यात भाजप नेते आणि चंद्रपूरचे माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे नामकरण झाले.

विशेष म्हणजे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि कार्यकर्तेही थेट मंचावर उपस्थित राहिल्याने सेना-भाजप युतीचा धागा पुन्हा एकदा जुळवण्याचा प्रयत्न आहे का? अशी चर्चा सुरु झाली होती.

दरम्यान, आम्ही सत्तेत सोबत नसलो, तरी शिवसेना आणि भाजप यांच्या विचारातील समानता कोणी तोडू शकत नाही, असं मुनगंटीवार उद्घाटनानंतर म्हणाले.

‘आज शिवजयंतीचा मुहूर्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे आणि जाणणारे, चांदा ते बांदा असलेल्या युवक-युवतींच्या हृदयापर्यंत तो विचार पोहचवणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव उड्डाणपुलाला देणं, याचा अर्थ युती किंवा सत्तेशी जोडता कामा नये.’ असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

‘काही नेते पक्ष किंवा सत्तेपेक्षा जास्त उंच असतात. त्यांचा विचार आकाशाने हेवा करावा, इतका मोठा असतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट म्हणून बहुसंख्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरले होते, की हे राज्य छत्रपतींच्या विचारानेच पुढे जाईल. त्याचा संबंध कृपया युतीशी जोडू नका, जेव्हा आम्ही एकत्र येऊ तेव्हा येऊ, पण याचा संबंध विचाराशी जोडला जावा’ असं आवाहन मुनगंटीवारांनी बोलताना केलं.

काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी संसदेत जाण्यास इच्छुक