…पण सरसकट राग धरून बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच अशी कारवाई केली नाही

Balasaheb Thackeray-Uddhav Thackeray

मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) राजवटीतही अनेक आंदोलने व्हायची. त्यावेळी त्यांच्या भूमिकेआड जो आला त्याला सेनेचा फटका बसला. पण सरसकट राग धरून बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच कारवाई केली नाही. आजही शिवसेना अनेक कलाकारांना मदत करते आहे. पण कंगनाच्या वक्तव्यानंतर मात्र शिवसेनेचा पवित्रा बदलला. वाचाळवीर कंगनाच्या वक्तव्यावर शांत असलेल्या शिवसेनेने (Shivsena) आपल्या भात्यातून थेट बुलडोझर काढला आणि बुधवारचं चित्र बदलून गेलं.

बॉलिवूड (Bollywood) आणि मुंबई (Mumbai) यांचे संबंध नेहमीच आई आणि तिच्या बाळासारखे राहिले आहेत. बॉलिवूडला या मुंबईनं वाढवलं. त्याचं पालनपोषण केलं. मुंबईवरही बॉलिवूडने प्रेम केलं. तिला आपल्या सिनेमातून वारंवार दाखवलं. हिंदी इंडस्ट्री मुंबईत असल्यामुळे आणि मुंबईचा रिमोट अनेक वर्षं शिवसेनेकडे असल्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि बॉलिवूडचे संबंध नेहमीच चांगले राहिले.

पण कंगनाच्या वक्तव्याने त्याला तडा दिला, असे मत व्यक्त होत आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी सौमित्र पोटे यांनी ब्लॉगमधून ‘बॉलिवूड… शिवसेना…  कंगना आणि बरंच काही!’ या मथळ्याखाली सौमित्र यांनी सध्याच्या कंगना आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरून हे विश्लेषण केले आहे. बाळासाहेबांचा दरारा…  त्यांची महाराष्ट्रावरची निष्ठा…  त्यांचं राहणं…  त्यांचं निर्णय घेणं… त्यांच्यावर ओढवलेले वाद… त्यांची भाषणं याचं कमालीचं कुतूहल बॉलिवूडला होतं. सिनेमा हे समाजाचं प्रतिबिंब असतं आणि सिनेमाचं प्रतिबिंब समाजावर पडतं.

त्या अर्थाने ठाकरे घराण्याचा राज्यातल्या जनमानसावर असलेला प्रभाव लक्षात घेऊनच बॉलिवूडनेही त्यांच्यावर सिनेमे बनवले. सरकार, बॉम्बे, ठाकरे या हिंदी सिनेमांसह झेंडा, बाळकडू आदी अनेक सिनेमांची आठवण यानिमित्ताने होते. बाळासाहेबांनी या सगळ्यांवर लक्ष ठेवलं; पण त्याचा त्रास कधी इंडस्ट्रीला होऊ दिला नाही, असे सौमित्रने ब्लॉगमध्ये लिहिले आहे. तसेच, कलाकार जेवढा प्रतिभावंत तेवढे त्याचे ठाकरे घराण्यासोबतचे संबंध मोकळे असायचे; कारण कलाकाराच्या प्रतिभेची कदर ठाकरे घराण्यालाही होती आणि ठाकरे घराण्याच्या हातात असलेल्या कलेची जाणीव कलाकाराला होती, असे सौमित्रने ब्लॉगमध्ये म्हटले आहे. मराठी मंडळींना तर बाळासाहेब आणि ठाकरे घराणं घरचं वाटायचं. आजही वाटतं- असाही उल्लेख त्यांनी ब्लॉगमध्ये (Blog) केला आहे.

दरम्यान, शिवसेनेनं कंगनाचं वक्तव्य इतकं मनावर का घेतलं? तिच्या वाचाळवीरांना प्रत्युत्तर देऊन शिवसेनेनं काय साधलं? अशा आशयाचे या ब्लॉगमध्ये विश्लेषण करण्यात आले आहे. तसेच शिवसेनेच्या या कृत्याचा पक्ष म्हणून भविष्यात काय परिणाम होणार हे पाहण्यासारखे असेल, असेही येथे अधोरेखित केले आहे.

ही बातमी पण वाचा : आज मेरा घर टूटा, कल तेरा घमंड टूटेगा; कंगनाचा मुख्यमंत्र्यांना इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER