बाळासाहेब, पवारांबद्दल टीका सहन केली जाणार नाही – संजय राऊत

सातारच्या गादीबद्दल आजही आदर कायम

Balasaheb Thackeray-Sharad Pawar-Sanjay Raut

मुंबई :- शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध भाजपाचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद संपण्याची चिन्ह काही दिसत नाहीत. कालच्या शाब्दिक वादावादीनंतर आज पुन्हा संजय राऊत यांनी उदयनराजेंना लक्ष केले. छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. परंतु, त्यांनी आमचा आदर करावा, आम्हीही त्यांचा आदर करू. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल कुठलीही टीका अथवा चुकीचे विधान सहन केले जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा राऊत यांनी आज उदयनराजेंना दिला.

छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वाचं दैवत आहे. ११ कोटी जनता शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. शिवसेनेने सदैव छत्रपती शिवाजी महारांजासमोर नतमस्तक होण्याचं कर्तव्य बजावलेलं आहे. उदयनराजेंच्या आई शिवसेनेत होत्या. शिवसेनेचे शिवाजी महाराजांच्या वंशजांशी जवळचे संबंध आहेत. महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे. तेव्हा आम्हाला कोणी छत्रपती शिवाजी महाराज या संदर्भात ज्ञान देण्याची गरज नाही. त्यांनी शिवाजी महाराजासंदर्भातील आपलं अंतरंग तपासून पहावं. तंगड्या तोडण्याची भाषा महाराष्ट्रात चालणार नाही. असं म्हणत संजय राऊत यांनी उदयनराजे यांना कडक इशारा दिला.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांची कोल्हापूर, सातारा किंवा अन्य ठिकाणी देखील ज्या गाद्या आहेत. जे राज्या त्यांनी निर्माण केलं आहे. त्या गाद्यांविषयी आम्ही सदैव आदर राखलेला आहे. छत्रपतींच्या गादीसमोर नतमस्तक होणं हे प्रत्येक हिंदू व मराठी माणसाचं कर्तव्य आहे. कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे हे सदगृहस्थ आहेत, आमचे व्यक्तिगत मित्र आहेत, अत्यंत संयमी आहेत. त्याच्याबद्दल मला कायम आदर आणि प्रेम आहे. तसेच शिवेंद्रराजे यांच्याबद्दलही आदर आहे. असं देखील त्यांनी म्हटलं.

अजित पवार स्टेपनी, तर सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे योग्य व्यक्ती – संजय राऊत