बाळासाहेबांनी तीस वर्षांपूर्वीच औरंगाबादचे संभाजीनगर केले, भाजपने वळवळ करु नये – शिवसेना

Balasaheb Thackeray - Sambhaji Nagar

मुंबई :- सध्या राज्यात औरंगाबाद (Aurangabad) शहराच संभाजीनगर (Sambhajinagar) नामांतरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हा मुद्दा शिवसेनेनेच (Shiv Sena) उचलून धरला. मात्र याला काँग्रेसकडून विरोध होत सत्तेत एकत्र असूनही काँग्रेसने विरोध केल्याने भाजपने शिवसेनेवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. आणि याच मुद्द्यावरून शिवसेनेने आजच्या सामानातून भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे.

‘शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारले. प्रश्न राहिला सरकारी कागदपत्रांचा. त्यावरही लवकरच दुरुस्ती होईल. भाजपास त्याची काळजी नको,’ असे म्हणत शिवसेनेने आपले मुखपत्र सामनामधून भाजपवर घणाघाती टीका केली. तसेच महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे. ‘महाराष्ट्राचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीशी बांधील आहे. न्न, वस्त्र, निवारा, पददलितांना न्याय, शेतकरी, कष्टकऱयांना बळ देण्याचा हा कार्यक्रम आहेच. तरीही कोणत्याही राज्याला धर्माचे व सरकारला स्वाभिमानाचे अधिष्ठान हवेच! औरंगजेब हा काही महाराष्ट्र धर्म किंवा स्वाभिमानाचे प्रतीक नाही. हे काँग्रेसवालेही मान्य करतील. औरंग्या हा काही सेक्युलरही नव्हता, हे समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये,’ असे म्हणत शिवसेनेने भाजपला धारेवर धरलं.

महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी होईल, असे वाटणारे ठार वेडे
काँग्रेसने औरंगाबाद शहराच्या नामांतराला विरोध केला आहे. तशी जाहीर भूमिका काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी घेतलेली आहे. त्यावर बोलताना ती काँग्रेसची जुनीच भूमिका असल्याचं म्हटलं. तसेच, महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये बिघाडी होईल असे समजणे चुकीचं असल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे. ‘औरंगाबाद शहराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. यावर भाजपास गलिच्छ उकळय़ा फुटल्या आहेत. काँग्रेसचा हा विरोध आजचा नाही. जुनाच आहे,’ असं म्हणत काँग्रेसच्या या भूमिकेचा संबंध महाविकास आघाडीच्या ध्येयधोरणांशी जोडणे मूर्खपणाचे आहे,’ असे स्पष्टीकरण शिवसेनेने आपल्या मुखपपत्रातून दिलं.

शिवसेनेने भूमिका बदललेलीच नाही
‘भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाचा घोर लागला आहे. आता शिवसेना काय करणार? असा प्रश्न चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) वगैरे लोकांनी विचारला आहे. औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्यासाठी शिवसेना आतापर्यंत आग्रही राहिली आहे. आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसने नामांतरास विरोध केल्याने शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा भाजपचा आग्रह आहे,’ असे म्हणत त्यात भूमिका स्पष्ट करण्याचसारखं काहीच नाही, असे म्हणत शिवसेनेने आपली भूमिका बदललेलीच नसल्याचं शिवसेनेने सांगितल. तसेच ‘बाळासाहेब ठाकरे यांनी तीस वर्षांपूर्वीच जाहीरपणे औरंगाबादचे संभाजीनगर केले. हे नामांतर लोकांनी स्वीकारल्याचं शिवसेनेने म्हटलंय. तसेच, औरंगाबादच्या नामकरणासाठीही लवकरच कागदपत्रांमध्ये दुरुस्ती करण्याची ग्वाहीसुद्धा शिवसनेने आपल्या मुखपत्रातून दिली आहे.

दरम्यान, शिवसनेने आपली भूमिका बदलली नसल्याचं जाहीर केलं आहे. तर काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला जाहीर विरोध केला आहे. त्यामुळे आता औरंगाबाद शहराच्या नामांतरावरुन पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ही बातमी पण वाचा : बाळासाहेबांचा ‘जनाब’ उल्लेख म्हणजे वैचारिक सुंता ;  कॅलेंडरवरुन भाजपची शिवसेनेवर हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER