समतोल हेच उत्तर !

Balance is the answer - Maharastra Today

कालचा चतुरंग वाचला का ग ? असं विचारल्यावर मैत्रीण म्हणाली,” सध्या मी पेपरच बंद केला आहे आणि फारसे बाहेर पडत नाही. मुले दूर असतात, ती सारखी सूचना देतात ,आई-बाबा काळजी घ्या बाहेर पडू नका .त्यांना काळजी कशाला लावायची ? ” बरोबरच आहे .सध्या आपल्या जवळच्या लोकांची ,आप्तांची ,आई-वडील आणि मुलाबाळांची काळजी सर्वदूर सगळ्यांना लागलेली आहे . सोशल मीडियावर जोरदार आवाजात, भयंकर शब्दांमध्ये सांगितल्या जाणाऱ्या बातम्या आणि दृष्य जिवाचा थरकाप उडवतात.

हे सगळं खरं आहे ! येणाऱ्या व्हायरसचे व्हेरिअनट्स इतके वेगवेगळे आहे. थोडक्यात संकट मोठं आहे. पण मला सभोवताली दोन प्रकारचे लोकं दिसतात. अतिरेकी काळजी घेणारे आणि पूर्णपणे निष्काळजी ! “कोरोना काय आपल्या मनातच असतो.” असं जास्त आत्मविश्वासाने म्हणणारे ,,नको त्या दिवसांमध्ये 50- 50 जण उगीचच जेवायला बोलावणारे ! एकीकडे एकदम पेपर वगैरे बंद करून, कोणी चुकून आले तरी सनीटायझरने डोअर नॉब, कडी ,खुर्च्या पुसणारे. त्यातून व्ह्याकसी – नेशन बाबत उठणाऱ्या अफवा ! थोडक्यात प्रश्न गंभीर आहे, त्यापेक्षा मानसिकता अवघड आहे . सर्वत्र आढळणारी विषमता,तिची दोन टोक इथेही आढळतात.

सध्याच्या काळात मला किंवा निकटवर्तीयांना आजार होईल का ? याची चिंता बऱ्याच लोकांचे मनाला कुरतडते आहे. बातम्या ऐकल्यावर एक प्रकारची भीती मनावर घाला घालते आहे . असुरक्षितता ,अनिश्चितता अशा परिस्थितीत उद्याचं काहीच निश्चित नाही .मग कुठले ध्येय आणि कुठले गोल्स ?अशी परिस्थिती प्रत्येकाची आहे . एकीकडे कितीही इम्युनिटी बुस्टर काढा प्यायला तरी इम्युनिटी कमी पडते आहे. असं का?कारण मानसिकता ही समतोल असायला हवी. काळजी घेणे आणि काळजी करणे हे दोन महत्त्वाचे प्रकार आहेत. काळजी करणे, चिंता ,भीती या गोष्टी आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम करतात .म्हणजेच प्रश्न जरी शारीरिक असतो ,किंवा असला तरी त्याला मनाच्या आधाराची गरज आहे. कसा होतो हा परिणाम ? काय सांगतेय संशोधन ?

आपल्या शरीरातील प्रक्रिया आणि कार्य नैसर्गिक पद्धतीने चालतात. त्या नॉर्मल पद्धतीवर सतत असणारी चिंता आणि ताण परिणाम करतात ,आणि ते पूर्ववत कधीच होऊ देत नाही .त्यामुळे प्रतिकार यंत्रणा अशक्त होत जाते. आपलं शरीर जास्तीत जास्त व्हायरल इन्फेक्शन आणि सततचे आजारपण यासाठी उद्युक्त होतं. आणि मग तुमच्या व्ह्याक्सिनेशनचा देखील उपयोग होत नाही.

तुम्ही सतत चिंता बाळगत असाल तर, सततचे एकटेपण असेल, किंवा विलगीकरण यांचाही कॅन्सर स्मृतीभ्रंश आणि काही प्रमाणात कोरोनाव्हायरस वर परिणाम होतो. Steve Cole हे मेडिसिन आणि जैववर्तनशास्त्राचे कॅलिफोर्निया या विद्यापीठातले प्रोफेसर त्यांनी एक संशोधन केलं .ज्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंग (NIA) यांचाही सपोर्ट होता. काही मानसिक अनुभव जसे यामध्ये दीर्घकालीन सामाजिक एकटेपणा ,कायमची दैन्यावस्था गरीबी, आणि महत्त्वाचं म्हणजे एखाद्याच्या किंवा स्वत:च्या सुरक्षिततेची सतत भीती वाटत राहणे याचा निश्‍चितपणे परिणाम आपल्या प्रतिकारशक्तीवर आणि तब्येतीवर होत असतो. माणसावर संकट आल्यावर त्याची मूळात प्रवृत्ती फाईट ऑर फ्लाईट अशी असते .म्हणजे लढा वा पळा ! पण cole यांच्या मता प्रमाणे Lonelinesss ती दुधारी तलवार आहे ,ती अशी की त्यामुळे आपली प्रतिकार यंत्रणा ढवळी जाऊन काही बॅक्टेरिया नष्ट करणारे ज्वलनशील पदार्थांची निर्मिती होते. जी कॅन्सर किंवा हृदयाचे आजार अशा नकळत हळूहळू निर्माण होणाऱ्या छुप्या आजारांना भडकवण्यासाठी इंधना सारखे काम करते.

कोणत्याही व्यक्तीला चिंता ,ताण ,भीती या भावना निर्माण होतात. त्यावेळी ती फाईट ऑर फ्लाईट हाच प्रतिसाद देते. हाच प्रतिसाद कायम स्वरुपाची भीती आणि असुरक्षितता यांनाही मिळतो . अशाप्रकारे त्या आजारांना उद्दीपित करतात .अशावेळी मानवी शरीराला ती भीती एखाद्या विषाणूची भीती आहे ? की कोणी लोकांनी नाकारले त्यामुळे आलेली आहे, याच्याशी त्यांना काहीही घेण देणं नसते.

खरंतर लोनेलीनेस चांगल्या प्रकारे देखील वापरता येतो. विपश्यना सारखी साधना करताना मौन राखायला सांगतात .त्यावेळेस स्वतःमध्ये डोकावून बघता येत. पण Cole यांच्या मते ,” Lonelyness makes us focus on ourselves , but redirecting that focus outward.. can change our outlook,our brains and our body chemistry !”

Cole आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही परिस्थितीवर उत्तम उपाय शोधलेला आहे. एकटेपणामुळे स्वतः डोकावून बघण्याची, जगाच्या कोलाहलापासून दूर होण्याची संधी मिळते खरी, परंतु त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन जर बहिर्मुख केला, आजूबाजूला बघितलं, लोकांना मदतीचा प्रयत्न केला तर यातूनही विचार व भावनांमध्ये सकारात्मक बदल घडून येतो.

टेरेस सिमन यांनी सांगितले ज्यांच्या आयुष्याबाबत, हेतूबाबत स्पष्ट कल्पना होत्या, काहीतरी करायचं होतं, मोठी ध्येय्ये होती त्यांच्यामध्ये विषाणूंवर विरोधी प्रतिसाद वाढत होता. भितीदायक भावनांचा आपल्या शरीरावर परिणाम होत असतोच. भीतीदायक दृश्य बघितलित की घाम येणे, हृदयाचे ठोके वाढणं ,अंग गरम होणे ,जीव घाबरणे हे प्रतिसाद शरीर दाखवते .म्हणजेच भावनांचाही शरीरावर परिणाम होतो. सकारात्मक व्यक्तिमत्व असणाऱ्यांना कर्करोगाची भीती कमी असतो. सायकोन्यूरोईम्यूनोलॉजी हे क्षेत्र रोगप्रतिकारक शक्ती आणि मज्जासंस्था यांचे एकमेकांशी कम्यूनिकेशन कसे होते व आरोग्यावर परिणाम कसा होतो याचा अभ्यास करते. मानवी रोगप्रतिकारशक्ती ही मुळातच समजण्यास अतिशय जटिल अशी प्रणाली आहे .थोडक्यात

यामध्ये नैसर्गिक कीलर पेशी असून यात विषाणू ओळखण्याची आणि मारण्याची क्षमता असते. व्हायरस शरीरात प्रवेश करतो तेव्हा यजमान पेशींचा स्फोट होईपर्यंत तो वेगाने वाढतो, जो शरीरात अधिक व्हायरस सोडतो. नॅचरल किलर पेशी एक विषारी पदार्थ तयार करतात ,ज्यामुळे संक्रमित व्हायरस नष्ट होतात . म्हणजेच आपली ही रोगप्रतिकारक शक्ती सदैव तयार राहणं चांगल्या प्रकारे काम करणं खूप आवश्यक आहे हे लक्षात येतं.

सकारात्मक विचार ,भावना, त्याचप्रमाणे आत्मस्वीकार आणि सन्मान हे पण रोगप्रतिकारशक्‍ती चांगली ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहे. स्वतःची निंदा आणि दोषारोप त्याचबरोबर ,राग ही एक भावना झाली ,द्वेषातून उद्भवलेल्या नकारात्मक भावना या स्पर्धेतून येत असल्यामुळे त्या आक्रमकतेने, मागे टाकणाऱ्या असतात. म्हणून जास्त घातक असतात.

म्हणूनच अशा वेगवेगळ्या प्रकारच्या या विषाणूंना तोंड देताना आपली प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी मानसिक समतोल आणि शारीरिक समतोल खूप महत्त्वाचा आहे. अतिरेकी चिंता काळजी, भीती , तेच तेच नकारात्मक विचार, यापासून दूर राहून फक्त स्वतःची आणि जिवलगाची योग्य अशी संतुलित काळजी घेणं आणि त्याबरोबरच शारीरिक समतोलासाठी, संतुलित आहार, पूरेशी झोप व विश्रांती , घाम गळेस्तोवर नियमित व्यायाम , ध्यान आणि विचार आणि भावना यांचा समतोल राखला तर कुठलेही विषाणू सहजतेने हल्ला करू शकणार नाही, आणि जरी रिपोर्ट पॉझिटिव असतील ,आजारी पडलात तरीही या समतोलामुळे होणारी रिकव्हरी अतिशय चांगली असणार आहे.

फ्रेंड्स ! म्हणूनच सध्याच्या प्रश्नावर” समतोल “हेच उत्तर आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट प्रत्येक जण मुळातून नेहमीच मानसिक दृष्ट्या सुदृढ असेल असं नाही. शरीराला अशक्तपणा आला तर ? तर लगेच डॉक्टरांकडे जाता येतं. तसेच कुठेतरी चिंता ,भीती, नैराश्य, अस्वस्थता ,अनिश्चितता, ताण वाटत असेल तर समुपदेशकांची मदत घ्यायला मागेपुढे बघायला नको. तेच तुम्हाला विषाणूंचे आक्रमण होऊ नये म्हणून ही मानसिक संतुलन राखण्यासाठी मदत करतील आणि जर चुकूनमाकून आजारी पडलात तरी बाहेर यायला ही मदत करू शकतील .बाकी वैद्यकीय उपचार तर आहेतच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button