मल्हारी मार्तंड खंडोबारायानं ७ कोटी सुवर्ण मुद्रांच कर्ज दिलं म्हणून बालाजीचं लग्न पार पडलं होतं!

Malhari Martand Khandobaraya

देव देवतांच्या अनेक कथा लोकगीतांमध्ये रुजल्या आहेत. राज्यांच्या आणि भुगोलांच्या सीमा ओलांडून देवतांची महती देशाच्या काना कोपऱ्यात पोहचल्याचं यावरुन दिसतं. संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत मानल्या जाणाऱ्या खंडोबाबद्दल अशा अनेक कथा प्रचलित आहेत. धनाचा देवता मानल्या जाणाऱ्या आंध्रप्रदेशच्या तिरुपती बालाजीला मल्हारी मार्तंड खंडोबानं सात कोटी सुवर्ण मुद्रांच कर्ज दिलं होतं.

झालं असं की, बालाजीचा विवाह पद्मावतीशी ठरला होता. विवाह मोठ्या थाटा माटात व्हावा, तेहत्तीस कोटी देव, राजे राजवाडे, प्रजा उपस्थीत राहील त्यांचा व्यवस्थीत मानपान व्हावा, अशी बालाजीची इच्छा होती. पण हा सोहळा पार पाडायला बालाजीकडं धनसंपत्ती अपुरी होती. मदत कुणाकडे मागावी. कर्ज कोणाकडून उपलब्ध होईल या विचारात ते होते.

त्यावेळी पुण्याजवळच्या खंडोबाची जेजूरी ‘सुवर्णनगरी’ म्हणून भारतभर गाजत होती. मणी मल्लाचा विनाश करणाऱ्या खंडोबाच्या ऐश्वर्य आणि पराक्रमाची दाही दिशांमध्ये चर्चा व्हायची. बालाजीपर्यंत खंडोबाच्या ऐश्वर्य आणि श्रीमंतचीच्या अनेक कथा पडल्या होत्या. त्यांनी तातडीनं सेवकाला बोलवून घेतलं आणि खंडोबाकडून लग्नकार्यासाठी धन रुपात मदत आणायचा आदेश दिला. सेवक जेजूरीच्या दिशेनं निघाला.

बऱ्याच प्रवासानंतर बालाजीचा सेवक जेजूरीत पोहचला. तेव्हा जेजूरीत मोठा दुष्काळ पडला होता. खंडोबानं सोन्याचे अलंकार काढून ठेवले होते. दुःखी कष्टीप्रजेमध्ये त्याचा साधेपणानं वावर होता. प्रजेसमान साधं जीवन जगत होता. राजेशाही थाटात तो दिसला नाही. राजा असल्याचा ऐशोआराम त्यानं सोडला होता. दाही दिशांना ज्या राजाच्या नावाचा डंका वाजतो त्याला असं मोकळं गरिबाप्रमाण जगताना महाबलीराजाची साधी राहणी बघून बालाजीचा सेवक आवाक झाला. तिरुपतीला मोकळ्या हातानं परतावं लागणार याची त्याला खात्री पटली.

तेवढ्यात खंडोबा देवाची नजर विचारात बुडेल्या सेवकाकडं वळाली. त्याचा उदास चेहरा पाहून म्हाळसाकांतानं त्याच्या चिंतेच कारण विचारलं. सेवकानं सारी हकिकत खंडोबाला सांगितली. बालाजी धनाचा देव. कुबेरहून त्याची श्रीमंती जास्त अशी मान्यता आहे. बालाजीच लग्न थाटामाटात झालं पाहिजे. त्याला धनाची काहीच कमी पडायला नको हे खंडोबानं ओळखलं. मागितल्या धनाच्या कित्येक पट धन खंडोबानं सेवकाला देऊ केलं.सेवकाचा यथायोग्य सत्कार, सन्मान केला. जेजूरीला सोन्याची जेजूरी का म्हणतात? याचा अर्थ सेवकाला त्यादिवशी समजला. खंडोबाची मदत पाहून त्याचा भ्रम दुर झाला.

बैलगाड्या भरुन धन तिरुपतीला पोहचवण्याची खंडोबानं व्यवस्था केली. संरक्षणासाठी सैन्याची एक तुकडी दिली. मुक्काम घेत, मजल दरमजल करतं लवाजमा तिरुपतीला पोहचला. साऱ्या धनाची मोजदाद झाली. सातकोटी सोन्याच्या मोहरा मल्हारीदेवानं बालाजीला पाठवल्या होत्या. बालाजी आनंदी झाला. त्याच्यता मुखातून उद्गार बाहेर पडले, “येळकोट येळकोट जय मल्हार…”

‘आभार पत्र’ आणि ‘विवाह पत्रिका’ बालाजीनं सेवकाकडून खंडोबाला पाठवली. विवाहाला ‘खंडोबा-म्हाळसा-बाणाई’ उपस्थीत होते. बालाजीनं खंडोबाकडून घेतलेलं सात कोटी सोन्याच्या मोहरांच कर्ज अजून फिटलं नाही असं म्हणलं जातं.

ही खंडोबा माहात्म्याची कथा आजही लोकमानसात व लोककथांमध्ये आजही जिवंत आहे.

संदर्भ- कुलदैवत खंडोबा- डॉ. विठ्ठल बापूजी ठोंबरे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button