खंडणीच्या गुन्ह्यात बाळ बोठेला अटक

Maharashtra Today

नगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला पोलिसांनी अटक केली. बाळ बोठेवर (Bal Bothe) विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याने आज त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, बोठेच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विवाहितेचा विनयभंग केल्याचा आरोप असलेल्या बोठे याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज नगरच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हत्याकांडातील संशयित मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे असल्याचे समोर आले.
त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचवेळी शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात बोठे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. तसेच तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून बोठेचा शोध पोलीस घेत होते.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोठे याला हैदराबाद येथील बिलाल नगर परिसरातून ताब्यात घेवून त्याला पारनेर न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी पारनेर न्यायालयाने त्याला १२ दिवस पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर बोठेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज बोठेची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.

मात्र, तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बोठेला वर्ग करावे, असे पत्र तोफखाना पोलिसांनी यापूर्वीच दिले होते. त्यानुसार बोठेला तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याला उद्या नगरच्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button