घर खर्च चालावा म्हणून कुस्त्यांचे आखाडे गाजवणाऱ्या बजरंगनं भारताला आशियाई खेळातलं पहिलं गोल्ड मेडल मिळवून दिलं!

Bajrang Punia - Maharashtra Today

हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात २००७ ला माछरौली गावात कुस्त्यांचा फड भरला होता. त्यावर्षी होळीचा दिवस होता ३ मार्च. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कुस्त्यांच्या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं. होळीच्या दिवशी कुस्त्यांच्या स्पर्धा आयोजित करण्याच्या तिथं जुना रिवाज आहे. एका पेक्षा एक तगडे मल्ल अंगावर माती मळून आखाड्यात उतरले होते. डाव प्रतिडाव सुरु होते. कुस्त्यांचा फड जोरात सुरु होता. तिथं जमलेले शेकडो लोक मल्लांच्या नावानं नारे देत होते.

तेवढ्यात एक १४ वर्षाच पोर आयोजकांच्या टेबलाजवळ आलं. कुस्तीत जिंकलेल्या पैशातून त्याच्या घरचं राशन भरलं जाईल हे त्याला माहिती होतं. स्पर्धेत सहभागी करुन घेण्यासाठी तो आयोजकांकडं गयावया करु लागला. त्याची तब्येत आणि समोरच्या मल्लांची अवस्था बघून त्यानं आखाड्यात उतरायला नको. हात पाय तुटेल. अधुपणा येईल असं आयोजक सांगत होते. ते पोर ऐकायला तयार नव्हतं. त्यानं आयोजकांकडून होकार मिळवलाच. शेवटी, “समोर असलेल्या मल्लांमधून एखाद्याला निवड आणि त्याच्याशी कुस्ती लढ.” असं आयोजकांनी सांगितलं. समोर उभारलेल्या मल्लांची तुलना त्यांची त्यांच्यातच शक्य होती. शेवटी त्यानं एकाला निवडलं. त्याच्यापेक्षा अडीच पट मोठ्या मल्लाला. स्पीकरवर कुस्तीची घोषणा झाली. प्रेक्षकांच्यात कुजबूज सुरु झाली. “दोन मिनीटात त्या चिमरड्याला हा मल्ल बाहेर फेकेल…” “त्याचा जीव बीव जाईल…” ही कुजबूज सुरु असतानाच दोघांनी दंड थोपटत कुस्तीला सुरुवात केली.

जसा विचार केला होता तसं काहीच झालं नाही. हे पोर त्या मल्लाच्या त्याच्या पकडीत आलं नाही. कधी खांद्यावरुन उडी घेऊन तर कधी दोन पायातून निसटायचं. कुस्तीत हे पोर तरबेज आहे हे लोकांनी हेरलं. काही सेकंदातच त्याच्या नावाचे नारे बुलंद झाले. आखाड्याला घेरून बसलेले प्रेक्षक ओरडत होते “बजरंग… बजरंग…” पाच मिनिट प्रतिस्पर्ध्याची दमछाक केल्यानंतर बजरंगनं त्याला आपटलं. वातावरण बदललं. त्याच्या नावच्या घोषणांनी तो दिवस गाजवला आणि बजरंगनं कुस्ती. लोक त्याच्या विजयानं इतके प्रभावी झाले की त्यांनी चादर भरुन दहा, वीस, पन्नास रुपयांच्या नोटा टाकल्या. हरियाणात बजरंग पुनिया (Bajrang Punia) नावाचा कुस्तीपटू उदयाला आला होता.

दिवस भराभर निघून गेले. इंडोनेशियात १८ व्या राष्ट्रीय खेळांना सुरुवात झाली होती. १९ ऑगस्ट २०१८ ला संपूर्ण देश बजरंग बजरंगच्या घोषणा देत होता. त्यानं एकानंतर एक विजय मिळवले. फायनल मध्ये पोहचला. जपानचा मल्ल त्याच्या समोर होता. बजरंगनं पहिल्यांदा ६-१ नं बढत मिळवली. दुसऱ्या डावात जपानच्या डाइचीन ६-६ गुणांनी बरोबरी साधली. नंतर ८-८ वर खेळ अडकला. पुढं १०-८ नं आघाडी घेतली. भारताला एशियाड खेळातलं पहिलं गोल्ड मिळालं ते मिळवून दिलं बजरंग पुनियानं.

याआधी त्यानं २०१३ ला त्यानं बुडापेस्टमध्ये वर्ल्ड चॅम्पियन शीपमध्ये ब्रॉंझ मेडल जिंकल होतं. २०१४ च्या साउथ कोरिया एशियन गेममध्ये त्यानं सिल्व्हर जिंकलं होतं. हे सर्व त्याच यश असलं तरी त्यानं संघर्षातून वाटत काढत हे स्थान मिळवलं होतं. झज्जर जिल्ह्यातल्या खुद्दन गावात बजरंगचा जन्म झाला. बालपण तंगीत केलं. लहान सहान गोष्टीसाठी त्याला मोठा संघर्ष करायला लागयचा. त्यातूनच संघर्ष करायची मानसिकता आणि खेळाडू प्रवृत्ती तयार झाली. कुस्तीची तयारी करुन जिथं त्याचे सहकारी घरी जाऊन तुप,दुध आणि थंडईवर मारायचे तेव्हा बजरंगला रोज दुध आणि भाकरीवर झोपावं लागायचं. त्याला हे आयुष्य बदलाचं होतं आणि कुस्ती हाच एकमेव मार्ग त्याच्या समोर होता.

कुस्ती महागडा खेळ होता. शेतीतून येणाऱ्या उत्पन्नाव कसातरी गुजारा व्हायचा. त्याला खुराक ही मिळायचा नाही. त्याला खुराक मिळावी म्हणून त्याचे वडील आणि भाऊ दुप्पट मेहनत करायचे. तो नेहमी त्याच्याहून वयानं आणि वजनानं मोठ्या असणाऱ्या मल्लांशी कुस्ती लढायचा. त्याच्या वयाचे मल्ल तर त्याच्याशी हातही मिळवायचे नाहीत. यातून येणारा सर्व पैसा घरात खर्चासाठी जायचा. बजरंगनं बक्षिस आणि घरच्यांचा विश्वास एकाच वेळी जिंकला. त्याच्या खर्चासाठी वडीलांनी कधीच मागं पुढं बघितलं नाही.

बंजरंगला २०१० नंतर सरकारी मदत मिळायला सुरुवात झाली. याआधी त्याचा खर्च बजरंगचे चुलत भाऊ नरेंद्र, मोठा भाऊ हरेंद्र आणि योगेश्वर दत्तनं उचलला. एशियन गेममध्ये मेडलच्या सोबतच त्यानं आजपर्यंत वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होत १३ मेडस जिंकलेत पैकी ५ गोल्ड मेडल आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button