
मुंबई: बनावट ‘टीआरपी’ घोटाळ्यात मुंबई पोलिकांनी रविवारी अटक केलेले ‘रिपब्लिक टीव्ही’ (Republic TV) या वृत्तवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) विकास खानचंदानी (Vikas Khanchandani) यांना येथील मुख्य महानगर दंडाधिकार्यांनी बुधवारी जामीन मंजूर (Bail Grant)केला. अटकेनंतर खानचंदानी यांना दोन आठवड्यांसाठी पोलीस रिमांडमध्ये पाठविण्यात आले होते.
खानचंदानी यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यावर सोमवारी सुनावणी होण्याआधीच रविवारी त्यांना अटक केली गेली होती. ‘एवढी काय घाई होती?’, असे विचारून अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.ई. कोठाळीकर यांनी नाराजी व्यक्त केली होती.
‘रिपब्लिक टीव्ही’ (इंग्रजी) व ‘रिपब्लिक भारत’ (हिंदी) या वृत्तवाहिन्यांचा ‘टीआरपी’ बनावटपण वाढवून घेण्यासाठी या वाहिन्यांच्या ‘एआरजी आऊटलायर लि.’ या मालक कंपनीने एका महिन्यात १५ लाखांहून अधिक रक्कम खर्च केली होती, असा दावा पोलिसांनी खानचंदानी यांच्या रिमांडसाठी केलेल्या अर्जात केला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार कंपनीने ही रक्कम ज्यांला दिली त्या अभिषेक कोलवडे याच्याकडून ती हस्तगत करण्यात आली. कोळवडे याने दिलेल्या माहितीवरून वृत्तवाहिनी सहाय्यक उपाध्यक्ष घनश्याम सिंग यांना अटक केली गेली. सिंग यांच्या तपासातून असे उघड झाले की, कंपनीच्या ‘सीओओ’ प्रिया मुकर्जी व खानचंदानी यांच्या सांगण्यावरूनच हे ‘बेकायदा’ व्यवहार केले जात होते.
खानचंदानी यांच्यावतीने याचा इन्कार करताना ज्येष्ठ वकील आबाद पोंडा म्हणाले होते की, खानचंदानी यांचा याच्याशी काही संबंध नाही. किंबहुना ‘रिपब्लिक टीव्ही’ सरकारच्या विरोधात बातम्या देते म्हणून सरकारचा राग आहे. त्यामुळेच काही करून या वाहिन्यांच्या व कंपनीच्या अधिकार्यांना खोटयानाट्या आरोपांवरून निष्कारण गोवले जात आहे.
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला