बॕडमिंटन कोर्टवरच्या यशस्वी बहिणी- बल्गेरियाच्या स्टोयव्हा सिस्टर्स

bulgarian Stoieva Sisters

पॕरिस: बॕडमिंटनपटू गॕब्रिएला स्टोयव्हा आणि स्टेफनी स्टोयव्हा ही नावे वाचली तर तुम्हाला अंदाज येईल की बहुदा या बहिणी असाव्यात. हा अंदाज बरोबरच आहे. मुळच्या बल्गेरियाच्या पण सध्या पॕरिसमध्ये स्थायिक झालेल्या या बहिणी आपले फ्रेंच ओपनचे गेल्यावेळचे उपविजेतेपद यंदा विजेतेपदात रुपांतरीत करण्याच्या दृष्टीने मैदानात उतरल्या होत्या पण दुसऱ्या फेरीत त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना ली सो ही व शीन स्युंग चॕन या जोडीने 21-11, 21-6 असे पराभूत केले.

पॕरिसमध्ये स्थायिक झाल्यामुळे आपल्या घरच्या मैदानावरच्या या स्पर्धेवर स्टोयव्हा भगिनींचे विशेष प्रेम आहे. ही आमची आवडती स्पर्धा आहे. येथील प्रेक्षक फारच छान आहेत. ते आम्हाला भरपूर पाठिंबा देतात. आमच्यासाठी हे दुसरे घरच आहे. म्हणून येथे चांगली कामगिरी करण्याचा आमचा प्रयत्न असतो असे या भगिनी म्हणतात.

2018 मध्ये त्या पहिल्या 8 जोड्यांमध्ये स्थान मिळवत बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनलसाठी पात्र ठरल्या होत्या मात्र यंदाचे वर्ष त्यांच्यासाठी संघर्षाचे ठरले. एप्रिलमध्ये बल्गेरियन बॕडमिंटन फेडरेशनशी त्यांचे मतभेद झाले. स्पर्धांमध्येही कामगिरी अपेक्षित झाली नाही.

पॕरिसचे उपनगर इस्सी लेस मोलिनोक्स येथील आयएमबीसी92 नावाच्या क्लबसाठी त्या खेळतात. फ्रेच ओपनचे ठिकाण स्टेड दी कुबरतेनपासून हा क्लब फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर आहे.

या शहरात आम्ही राहतो. आमच्या कठिण काळात हा क्लबच आमच्या पाठिशी उभा राहिला. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. म्हणून आम्ही वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये क्लबचीच जर्सी घालून खेळतो असे त्या सांगतात. यात 25 वर्षांची स्टेफनी ही गॕब्रिएलापेक्षा एका वर्षाने तरुण आहे.

बल्गेरियातील छोटेसे शहर हास्कोव्हा हे या बहिणींचे मूळ गाव. राजधानी सोफियापासून तीन तासाच्या अंतरावर. त्यांच्या वडिलांना खेळाची आवड म्हणून 2003 मध्ये त्यांनी खेळायला सुरूवात केली. त्यावेळी इंटरनेट, स्मार्टफोन नव्हते म्हणून त्यांना इतर मुलांसोबत खेळण्याशिवाय पर्याय नव्हता पण त्यामुळेचआज त्या जगात टॉप-10 मध्ये आहेत. 2006 मध्ये त्या 13 वर्षाआतील गटात राष्ट्रीय विजेत्या ठरल्या. त्यानंतर वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी सोफिया येथे व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. पाच वर्षे तेथे धडे गिरवल्यावर त्या फ्रान्समध्ये आल्या. तिथे मिहाईल पोपोव्ह यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यांनी स्टौयव्हा बहिणींना आयएमबीसी92 क्लबकडै आणले.

स्टेफनी व गॕब्रिएला या कधीही एकमेकांशिवाय खेळल्या नाहीत. त्यांची खेळाची शैली एकमेकाला पूरक आहे. एक बॕक कोर्टला चांगली तर दुसरी फ्रंट कोर्टला चांगली खेळते. ही परफेक्ट जोडी आहे असे प्रशिक्षकांना वाटते. आमच्या प्रशिक्षकांनी आमच्या शारीरिक व मानसिक फिटनेसवर मेहनत घेतलीच शिवाय आमच्या तंत्रातही बदल केला. त्याचा परिणाम म्हणून टॉप टेनमध्ये स्थान मिळवलेली त्यांची जोडी ही एकमेव बिगर आशियाई जोडी आहे. 2014 मध्ये स्कॉटिश ओपन, 2015 मध्ये रशियन ओपन व डच ओपनशिवाय युरोपियन गेम्सचे त्यांनी सुवर्ण पदक जिंकले.

युरोपियन विजेतेपदही त्यांच्या नावावर लागले आहे. डेन्मार्क व इंग्लंडशिवाय युरोपियन विजेतेपद प्रथमच दुसऱ्या देशाकडे गेले.

भारतात प्रीमियर बॕडमिंटन लिगमध्येही त्या खेळल्या. स्टेफनी अहमदाबाद स्मॕश मास्टर्स आणि गॕब्रिएला मुंबई रॉकेटससाठी खेळल्या. भारतात खेळायला आपल्याला खूप मजा आली. आम्ही भारतीय खेळाडूंना ओळखत होतो पण भारतात खेळयला एवढी मजा येईल असे वाटले नव्हते असे भारतात खेळण्याबद्दल त्या सांगतात. त्यांना भारतीय पोशाखांची विविधता, वेगवेगाळ्या शहरांची भिन्न भिन्न संस्कृती या गोष्टी त्यांना फार भावल्या, पण भारतीय मसालेदार जेवण मात्र आपण खाऊ शकत नाही असे त्या सांगतात.

स्टेफनी सांगतै की ती आठ वर्षांची असताना त्यांचा खेळ सुरु झाला. सुरुवात स्टेफनीनेच केली. माझ्या मित्राने मला या खेळाकडे वळवले. हौस म्हणून सुरुवात केल्यावर आम्ही कधी व्यावसायिक खेळाडू बनलो ते कळलेच नाही.

गॕब्रिएला म्हणते की मला नृत्यात रस होता. पण एका दिवशी मी बॕडमिंटन हॉलमध्ये गेले आणि प्रशिक्षकाने मला खेळायला सांगितले. आणि तेथून सुरुवात झाली. बल्गेरियात फूटबॉल, जिम्नॕस्टिक्स आणि व्हॉलिबॉलएवढे बॕडमिंटन लोकप्रिय नाही पण आता स्टोयव्हा भगिनींच्या यशानंतर बल्गेरियन लोकांचे लक्ष या खेळाकडे वळू लागले आहे