बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही, मी सध्या मुख्यमंत्री नाही – पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या केलेल्या घोषणेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यानी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा सध्या सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनबाबत परस्पर निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यावर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीतील कुरबुरी, कोरोनाचं संकट या पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत करताना चव्हाण म्हणाले की, कोरोनाचं संकट मोठं आहे. पण केंद्रातून दररोज वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत. प्लाझमा थेरपीबाबत संभ्रम आहे. लॉकडाऊन करायचं की अनलॉक करायचं? केंद्राने नीट गाईडलाईन बनवली नाही, त्यांनी राज्यांवर जबाबदारी ढकलली. त्यामुळे राज्य सरकारे आपआपल्या परीने निर्णय घेत आहेत.

महाराष्ट्रात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय कसा झाला याबाबत संभ्रम आहे. थेट महिनाभर लॉकडाऊन वाढवण्यात आला. अनलॉक १, अनलॉक २ बाबत चर्चा सुरु आहे. काँग्रेस नेते आणि अन्य पक्षाचे नेतेही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. जिथे रुग्ण वाढले तिथे लॉकडाऊन ठिक आहे, हा निर्णय कसा झाला याबाबत चर्चा होईल, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी महाविकास आघाडीतील कुरबुरीवर भाष्य केलं.

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना तुम्ही मुख्यमंत्रिपदी असताना प्रशासनावर पकड होती, सध्याची परिस्थिती काय आहे, असा प्रश्न विचारला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही. मी सध्या मुख्यमंत्री नाही, उद्धवजी मुख्यमंत्री आहेत. महत्त्वाच्या सूचना, सल्ला हवा असतो तेव्हा ते घेतात, प्रशासनाची पकड वगैरे म्हणणे योग्य होणार नाही. प्रत्येकाची आपआपली मतं असतं, कोणत्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं ही आपआपली मतं असतात. जो खुर्चीत बसतो त्याने निर्णय घ्यायचा असतो. पण बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही. इतरांचे सल्ले घ्यायचे की नाही, प्रशासनाचं ऐकायचं की अन्य कुणाचा सल्ला घ्यायचा, राजकीय पुढाऱ्यांचा सल्ला घ्यायचा की राजकीय अनुभव असणाऱ्यांचा सल्ला घ्यायचा हे त्यांचा अधिकार आहे, त्यांनी तो घेतला पाहिजे” असेही चव्हाण म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER