चार लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही महाराष्ट्र का पेटत नाही – आ. बच्चू कडू

सोलापूर : दारूच्या व्यसनामुळे किंवा मुलीच्या लग्नाच्या काळजीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, असे सांगून शेतकऱ्यांची बदनामी केली जात आहे. शेतकऱ्यांना कोणी वाली नाही. जातीय दंगलीने गावे पेटतात. परंतु चार लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही महाराष्ट्र का पेटत नाही, असा संतप्त सवाल अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.

प्रहार शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ११ एप्रिलपासून काढलेल्या सीएम टू पीएम आसूड यात्रेचे शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी या सभेत अपक्ष आमदार बच्चू कडू हे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणालेत,’ केंद्र तसेच राज्यातील सरकारला धडा शिकवण्यासाठी धर्मेंद्र जन्माला येण्याची गरज आहे.

दरम्यान, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारवर टीकेचा भरीमाड केला. ते म्हणाले, आसूड यात्रेत तरुणांनी सहभाग घेतल्यास पंतप्रधान मोदी यांनाही घाम फुटेल. जात, पंथ, धर्म यामुळे शेतकऱ्यांची लढाई मागे पडली आहे. गेल्या ६० वर्षांत शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलन केले. या काळात केंद्र राज्यात अनेकदा सत्तापालट झाले, तरीही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय झाले नाहीत. मुख्यमंत्री फडणवीस आणखी किती आत्महत्यांची वाट पाहत आहेत.