शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कोविड केअर सेंटरला पालकमंत्री बच्चू कडू यांची भेट

Bacchu Kadu

अकोला : पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी कोविड रुग्णांवर उपचार होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील कोविड केअर सेंटर येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, डॉ. शिरसाम तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता व्यवस्था, कोविड वार्डातील रुग्णांना दिले जाणारे चहा, नाश्ता भोजन व्यवस्था यांची पाहणी केली. प्रत्यक्ष स्वतः चहा पिऊन चाचणी घेतली. या चहामध्ये आलं अवश्य घालावे, अशी सूचनाही त्यांनी प्रशासनाला केली. तसेच जेवणाचा दर्जा उत्तम व आहार मानकांनुसार असावा अशी सूचना केली. तसेच जेवणासाठी प्लास्टिक कोटेड वा कागदी पत्रावळी न वापरता नैसर्गिक पानांच्या पत्रावळी वापराव्या अशी सूचना केली. या सूचनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी संबंधितांना दिले. तसेच सकाळी सात वाजेपर्यंत चहा दिला जावा, ८ वाजता नाश्ता व १२ वाजेपर्यंत जेवण या वेळांचे पालन व्हावे, यासाठी प्रशासनाने काटेकोरपणे सर्व प्रक्रियेवर लक्ष द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व परिसराची स्वच्छता उत्तम राखली जावी. इथले वातावरण आल्हाददायक असावे, त्यासाठी सर्व आधुनिक व्यवस्थांचा वापर करा, त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी निर्देशित केले.

पीकेव्ही मधील सेवांबद्दल प्रशासनाचे कौतुक

पालकमंत्री कडू हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कोविड केअर सेंटर मधील निरीक्षणाखालील रुग्णांची भेट घेऊन पाहणी करण्यासाठी गेले. तेथे त्यांनी रुग्णांची विचारपूस करुन प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल माहिती घेतली. यावेळी रुग्णांनी इथे दिल्या जाणाऱ्या सेवा, जेवण, जेवणाचा दर्जा, स्वच्छता तसेच वैद्यकीय सेवा या उत्तम असल्याचे सांगितले. यावेळी दाखल रुग्ण व निरीक्षणाखालील रुग्ण यांची माहितीही श्री. कडू यांना सांगण्यात आली. इथे दिल्या जात असलेल्या सेवांबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले व प्रशासनाचे कौतुकही केले.

Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER