‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ निराधार महिलांसाठी बच्चू कडूंची योजना!

Bacchu Kadu

अमरावती : अमरावतीच्या अचलपूर विभागातील निराधार, विधवा आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांतील महिलांना आधार मिळावा, यासाठी राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या पुढाकाराने ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ ही योजना सुरू केली आहे.

शेतकरी कुटुंबात पतीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचा चरितार्थ चालवण्याची वेळ महिलांवर येते. पण पावसाळा सुरू झाल्यावर पेरणीसाठी पैसा आणायचा कुठून? अशा विवंचनेत या महिला-भगिनी असतात. ही बाब बच्चू कडू यांच्या लक्षात येताच त्यांनी ‘ट्रॅक्टर आमचा, डिझेल तुमचे’ ही योजना जाहीर केली.

बच्चू कडू यांची मातोश्री इंदिराई कडू यांच्या वाढदिवशी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेची नोंदणी अचलपूर गावामध्ये सुरू करण्यात आली. आतापर्यंत जवळपास २०० एकरापेक्षा जास्त शेतीची कामे या योजनेतून करून दिले आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व गावांत ही कामे पूर्ण करून त्या महिलांच्या कुटुंबीयांना शेतीसाठी मोठा आधार या योजनेतून मिळत आहे.

या संकल्पनेची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा
अमरावतीतील अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यातील ६०० किमी लांबीच्या पांदण रस्त्याचे उद्घाटन झाले. दोन्ही तालुक्यांतील सुमारे ११७ गावांतील ६०० किमी लांबीच्या पांदण रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. रस्तेनिर्मितीसाठी स्वतः बच्चू कडू यांनी त्यांच्या आमदार निधीतून १ कोटी ४४ लाख ४३ हजार ५६० रुपयांचा निधी दिला. याव्यतिरिक्त पालकमंत्री पांदण रस्ते योजनेतून ५ कोटी ६० लाख, तर मनरेगातून ४ कोटी २ लाख रुपयांचा निधी रस्तेनिर्मितीसाठी मिळाला आहे.

अचलपूर तालुक्यातील पांदण रस्ते तसेच जिल्ह्यातील या प्रकल्पासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. जिल्ह्यात पांदण रस्त्यांची कामे वेळेत आणि योग्य पद्धतीने पूर्ण व्हावीत, तसेच या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल बाजारपेठेपर्यंत पोहचवणे सोयीचे होईल. तसेच ग्रामस्तर, मंडळस्तर आणि तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी या योजनेची प्रशंसा केली आहे. पांदण रस्ते ही एक लोक चळवळ म्हणून उभारण्यात यावी, अशी मागणी सर्वांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button