भाजप कार्यकर्त्यासारखे राज्यपाल वागले – बच्चू कडू

नागपूर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी गेल्या वर्षभरात भाजपच्या कार्यकर्त्यासारखे वागले. त्यांनीच राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) पदाचा सन्मान ठेवला नाही, अशी टीका राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केली. राज्यपालांना सरकारी विमान प्रवास नाकारणे हा केवळ तांत्रिक मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आज राज्यपालांना शासनाच्या विमानाने प्रवास करण्यास परवानगी मिळाली नाही. यावरून मोठा राजकीय गदारोळ झाला. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी ठाकरे सरकारच्या कृतीचे समर्थन केले आणि राज्यपालांवर टीकेची तोफ डागली. तसेच विनाअनुदानित शाळांचे अनुदान वाढवण्याचा निर्णयही यावेळी बच्चू कडूंनी जाहीर केला. ज्या शाळांना सध्या ० ते २० टक्के इतके अनुदान मिळत आहे त्यांचे लवकरच २० ते ४० टक्क्यांपर्यंत अनुदान वाढवले जाईल, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. राज्यात अतिरिक्त फी घेणाऱ्या सीबीएसई शाळांवर कारवाई करण्याचा इशाराही बच्चू कडूंनी दिला. यासाठी राज्यभरात विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. आतापर्यंत नागपुरात पाच शाळांवर कारवाई करण्यात आली, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER