या मराठी माणसाच्या चित्रपटामुळे इंग्रजांनी देशात सुरु केली सेंसॉर पद्धत

Baburao Painter

भारतात पूर्वी सेंसॉर (Sensor) नावाचा प्रकारच नव्हता. परंतु इंग्रजांची सत्ता असताना भारतात जनतेला जागृत करण्यासाठी चित्रपटांचा आधारत घेतला जाऊ लागला आणि म्हणूनच देशात इंग्रजांनी सेंसॉरची स्थापना केली. याला कारणीभूत एक मराठी निर्माताच ठरला होता. याच मराठी माणसाने संपूर्णतः देशी बनावटीचा मूव्ही कॅमेराही तयार केला होता.

अमेरिकेत चित्रपट बनवण्यास सुरुवात झाली त्यासाठी बेल अँड हॉवेल कंपनीने कॅमेरा तयार केला होता. त्या कॅमेऱ्याने चित्रपट निर्मिती केली जात असे. मात्र हे कॅमेरे खूप महाग असल्याने ते सगळ्यांनाच परवडत नव्हते.

या महान व्यक्तीचे नाव कलामहर्षि बाबुराव पेंटर (Baburao Painter). कोल्हापूरमध्ये बाबुराव पेंटर आणि त्यांचा भाऊ आनंदराव पेंटर यांनी भारतीय कॅमेरा तयार करण्याचा चंग बांधला. ते काही इंजीनियर नव्हते. पण आपण कॅमेरा का बनवू शकत नाही या विचाराने त्यांना झपाटले आणि त्यांना यावर काम सुरु केले. या दोघांनी बेल अँड हॉवेल कंपनीचा कॅमेरा विकत घेतला. तो संपूर्णपणे खोलून ठेवला. खोलताना तो कसा खोलला हे लिहून ठेवले आणि त्यानंतर रिव्हर्स इंजिनीयरिंग पद्धतीने स्वत: मुव्ही कॅमेऱ्याचा शोध लावला. कॅमेरा तयार झाल्यानंतर बाबूराव पेंटर यांनी एक डिसेंबर 1917 ला महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. आणि याच कॅमेऱ्याचा वापर करून “गुड नाईट’ नावाचा काही फूट लांबीचा लघूपट बनविला. बाबुराव पेंटर यांचे खरे नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री. चित्रकला, शिल्पकला आणि लाकूडकामात त्यांचा हातखंडा होता. म्हणूनच त्यांना पेंटर असे नाव देण्यात आले होते. मुंबईत त्यांनी 1908-09 मध्ये आपला फोटो स्टुडियो सुरु केला होता. आणि त्याचवेळी त्यांना मूव्ही कॅमेरा बनवावेसे वाटले होते. कृत्रिम प्रकाशयोजना, कॅमेऱ्यासाठी ट्रॉली, त्रिमितीतील नेपथ्य, कपडेपट, रंगीत पडदे, थिएटर सजावट आदी प्रकार त्यांनीच चित्रपट उद्योगात आणले. त्यांनी बनविलेला पहिला चित्रपट सैरंध्री पुण्यातील आर्यन थिएटरमध्ये ७ फेब्रुवारी १९२० रोजी दाखविला. या चित्रपटातील भीम व कीचक यांचे द्वंद्व युध्द प्रेक्षकांना अचंबित करणारे होते. या चित्रपटानंतरच इंग्रजांनी देशात सेन्साॅर पद्धत सुरू केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER