बाबरी मशीद निकाल : निर्दोष मुक्तता झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी म्हणाले…

LK Advani - Murli Manohar Joshi

नवी दिल्ली : बाबरी मशीद (Babri Masjid) प्रकरणी लखनौच्या विशेष न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) आणि भाजपा (BJP) नेते मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनौच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला.

बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली, असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं. बहुप्रतीक्षित निकालानंतर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, अडवाणी यांनी म्हटलं आहे की, “बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो. या निर्णयामुळे रामजन्मभूमी चळवळीबाबत माझी वैयक्तिक आणि भाजपाचा विश्वास आणि वचनबद्धता सिद्ध होते.” तर, न्यायालयाच्या निकालानंतर “आमचं आंदोलन कोणतंही षडयंत्र नव्हतं हे सिद्ध झालं.

आम्हाला खूप आनंद झाला आहे. न्यायालयानं आता हा निर्णय दिला असून हा वाद संपला पाहिजे. संपूर्ण देशाला राम मंदिराच्या उभारणीच्या कामाला लागलं पाहिजे. ” असं मुरली मनोहर जोशी म्हणाले. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली. “राम मंदिराचं आंदोलन एक ऐतिहासिक क्षण होता. आज न्यायालयानं एक ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सुरुवातीपासून आम्ही प्रत्येक जे सत्य होतं तेच न्यायालयासमोर मांडलं. सर्व वकिलांच्या मेहनतीमुळे आणि लोकांच्या साक्षीमुळे हा निर्णय आज आला आहे. आता राम मंदिराच्या उभारणीचं कार्य सुरू होणार आहे. जय सिया राम, सबको सन्मती दे भगवान. ” असंही ते म्हणाले.

सर्व ३२ आरोपींची निर्दोष मुक्तता करताना न्यायालयाने सांगितलं की, “विश्व हिंदू परिषदेने यामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणतीही भूमिका बजावली नाही.” अज्ञात लोकांनी पाठीमागून दगडफेक केल्याचं निदर्शनात आल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलं. या प्रकरणात भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आरोपी होते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांनी १६ सप्टेंबरला सर्व आरोपींना निकालाच्या दिवशी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. निकाल सुनावला जात असताना २६ आरोपी कोर्टात हजर होते. लालकृष्ण अडवाणी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजेरी लावली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER