बबड्या माझं पहिलं प्रेम

Ashutosh Patki

एखाद्या मालिकेची जर भट्टी जमली तर त्या मालिकेची कथाच नव्हे तर त्यातली पात्रेसुद्धा लोकप्रिय होतात आणि अशी घराघरांत लोकप्रिय होणारी भूमिका पहिल्याच संधीमध्ये मिळाली तर हा त्या कलाकाराच्या अभिनय कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट ठरत असतो. असाच टर्निंग पॉइंट अभिनेता आशुतोष पत्की (Ashutosh Patki) याच्या अभिनय कारकिर्दीमध्ये ‘अग्गं बाई सासूबाई’ (Aggabai Sasubai) या मालिकेच्या निमित्ताने आला. अर्थातच प्रत्येक कलाकाराला त्याच्या आयुष्यातील पहिली भूमिका ही कायम लक्षात राहणारी असते. भविष्यात त्यांनी कितीही भूमिका केल्या आणि त्या भूमिका यशस्वी झाल्या तरी पहिलं प्रेम हे त्याच्या पहिल्या भूमिकेवरच असतं. म्हणूनच ‘बबड्या’ हे पात्र घरोघरी पोहचवणारा आशुतोष पत्की याचंही पहिलं प्रेम हे त्याने छोट्या पडद्यावर रंगवलेल्या बबड्या या पात्रावरच आहे. नुकतीच ‘अग्गं बाई सासूबाई’ ही मालिका आता नव्या पर्वात प्रेक्षकांसमोर आली आहे. पहिले पर्व ज्याने गाजविले तो आशुतोष पत्की आता या नव्या पर्वातील मालिकेत दिसणार नसला तरी ही मालिका सोडताना त्याच्या मनात अनेक आठवणी आहेत आणि म्हणूनच या मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आशुतोषने भावुक होत बबड्या माझं पहिलं प्रेम कसं लिहीत बबड्या लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. मिस यू बबड्या म्हणत चाहत्यांनीही खूप सार्‍या कमेंट दिल्या आहेत.

सून पुढाकार घेऊन आपल्या सासूचे दुसरे लग्न करून देते या वनलाईन स्टोरीवर बेतलेली ‘अग्गं बाई सासूबाई’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांना भावली. खरं तर प्रत्येक घरात बबड्या नावाचं कॅरेक्टर असतं , जे आईच्या लाडामुळे तयार झालेलं असतं. प्रत्येक गोष्ट आईनेच करावी असं वाटणारा हा बबड्या खूप घरांमध्ये दिसत असल्यामुळे बबड्या ही व्यक्तिरेखा खूपच लोकप्रिय झाली. तसं बघायला गेलं तर या व्यक्तिरेखेला ग्रे शेडदेखील होती. त्यामुळे म्हटलं तर हा नायक होता आणि म्हटलं तर खलनायक. पण तरीही नायक व खलनायक या दोन्हीतली पुसटशी रेष जपत ही भूमिका आपल्या अभिनयाने जिवंत करण्यात अभिनेता आशुतोष पत्की याने बाजी मारली. मालिकांमध्ये दाखवलेल्या गोष्टी नेटकऱ्यांकडून ट्रोल केल्या जातात तशी बबड्या या व्यक्तिरेखेलाही चांगले-वाईट प्रतिसाद आले. कुणाला बबड्या आवडला तर अनेकांच्या डोक्यात गेला; पण तरीदेखील या मालिकेवर व बबड्यावर प्रेम करणं प्रेक्षकांनी बंद केलं नाही. मालिकेच्या पहिल्या पर्वातून अभिनेता आशुतोष पत्की बाहेर पडत आहे आणि म्हणूनच त्याला त्याच्या आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या भूमिकेविषयी खूप बोलावसं वाटलं.

आशुतोषने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोखाली लिहिलेल्या ओळीमध्ये असं म्हटलं आहे की, बबड्या ही केवळ माझ्यासाठी भूमिका नव्हती तर समाजातल्या अशा अनेक मुलांचे प्रतिनिधित्व मी केले ते खरंच आपल्या आईला खूप गृहीत धरतात. ज्या आईने आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी स्वतःच्या आनंदावर व स्वतःच्या इच्छा आकांक्षावर पाणी सोडलं त्या आईला काय वाटतं हे अनेकदा विचारत नाही. बबड्या हे असंच पात्र होतं ज्यानं आईला अप्रत्यक्षरीत्या त्रास दिला. तिला तिचं आयुष्य जगू दिलं नाही. त्यामुळे अनेकदा मी जेव्हा बाहेर जायचो तेव्हा प्रेक्षकांकडून माझा राग केला जायचा. अशा प्रतिक्रिया माझ्यापर्यंत यायच्या. अर्थात एक भूमिका म्हणून ती माझ्या अभिनयाला मिळालेली दाद होती. बबड्याने मला आशुतोष म्हणून खूप काही शिकवले आहे. बबड्या ऊर्फ सोहम कुलकर्णी ही माझी पहिलीच भूमिका . आणि तीदेखील एक खलनायक असूनसुद्धा मला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. या मालिकेमध्ये असे काही सीन दाखवण्यात आले जे काही प्रेक्षकांना पटले नाहीत. त्यामुळे अनेकांनी आमच्यापर्यंत त्यांची नाराजी व्यक्त केली. आमच्या मालिकेवर सोशल मीडियामध्ये खूप मिम्स तयार झाले. तसेच अनेक जोक्समध्ये आमच्या मालिकेतल्या संदर्भांनी पात्रांची नावं वापरली गेली. इतकंच नव्हे तर कोरोना काळामध्ये जी नियमावली सरकारने केली होती त्या नियमांमध्येही बबड्या हे पात्र वापरून लोकांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला. तर या गोष्टी एक अभिनेता म्हणून माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत आणि मला समाधान देणारे आहेत.

यापुढे या मालिकेचा मी भाग नसलो तरी या मालिकेमध्ये मी रंगवलेला बबड्या हा मुलगा सतत मला ही जाणीव करून देईल की, माणूस म्हणून मी कशा पद्धतीने वागले पाहिजे. आईचा आदर केला पाहिजे. तिच्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे. एखादी भूमिका आपल्याला माणूस म्हणून खरंच घडवत असल्यानं अशी भूमिका मिळणं हे खरंच भाग्याचं असतं आणि ती पहिल्याच मालिकेत मला मिळाली. भविष्यात माझ्या वाट्याला कितीही भूमिका आल्या आणि त्या कितीही यशस्वी झाल्या तरी मी बबड्या कधीच विसरणार नाही.

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आशुतोष याने अभिनयात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. बाईकवरून भटकायला त्याला खूप आवडतं तसंच त्यानं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण केलं आहे. आशुतोष हा स्वतःच हॉटेल सुरू करणार होता; पण ‘अग्गं बाई सासूबाई’ या मालिकेत काम करण्याची संधी त्याला मिळाली आणि त्याचं जग बदलून गेलं. आशुतोषने ही मालिका जरी सोडली असली तरी बबड्याला आपल्यापासून कधीच दूर करणार नाही हे वचन त्याने स्वतःला दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER