बाबांनो देश प्रदेश शहरे गावे सर्वांचे भले करा हो…बास्स

Coronavirus - Ganpati Utsav - Editorial

Shailendra Paranjapeपुणे हे गणेश मंडळे, सामाजिक संस्था यांचं मोहोळ आहे. त्यामुळेच गेल्या वर्षी एप्रिल मे मधे देशव्यापी कडक लॉकडाऊनमधे  (Lockdown) अशा अनेक गणेश मंडळांनी वेगवेगळ्या भागात अक्षरशः हजारो सामाजिक कामं सुरू होती. सर्वप्रथम सामान्य गोरगरीबांना, पथारीवाल्यांना, गाड्या घेऊन छोट्या मोठ्या वस्तू विकून कसंबसं घर चालवणाऱ्यांचं घर चालावं किंवा त्या घरातल्या सर्वांना दोन वेळचं जेवण तरी बनवता यावं, यासाठी राजकीय पक्षांसह या सर्व गणेश मंडळांनी. संस्थांनी दोन महिन्यांचे शिधा हजारो कुटुंबांना वाटलेत.

पुणं या सगळ्या बाबतीत कायम महाराष्ट्राला देशाला दिशा दाखवतं. त्यामुळे पुण्याच्या मानाच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने, अखिल मंडई मंडळाने २०२० मधे गणेशोत्सव साजरा करणार नाही आणि हा पैसा करोनाच्या लढ्यासाठी देऊ, हे सर्वप्रथम जाहीर केले. राज्यात सर्व भागात करोनाचे संसर्ग असल्याने पुण्यापाठेपाठ मुंबईच्या मंडळांनी करोनामुळे गणेशोत्सव अगदी साधेपणाने करण्याचे जाहीर केले. मग काय, राजयभरच्या गणेशोत्सव मंडळांची रांगच लागली. राज्यभर लोकांनी गणपती उत्सव जो सर्वाधिक औत्सुक्याचा विषय असतो, तो गेल्या वर्षी फारसा साजरा झाला नाही. त्यामुळे पुणे दिशा देतच असते.

करोनामुळे (Corona) नुकसान तर सर्वांचेच आहे. हा रोग सिलेक्टिव्ह नाही पण त्याच्या गेल्यावर्षीच्या राज्यातल्या रुग्णांमधे त्यातही वरिष्ठ नागरिकांना लागण मोठी होती पण यंदाच्या दुसऱ्या लाटेत मध्यमवयीन आणि मिडलक्लास मधल्या नागरिकांना करोना संसर्ग खूप वेगाने पसरत गेला. त्यामुळे त्यामधे विविध गोष्टींचा तुटवडा, काळा बाजार वगैरे विषय चावून चोथा झालेले आहेत. त्यात आता दुसरी लाट ओसरतीय आणि शुभवर्मान कधीही येऊ शकतं. त्यामुळे ते येवो, हीच प्रार्थना.

त्यामुळे त्या सर्व घटकांवर चर्चा करणे फारसे ठीक नाही. मी यापूर्वीही लिहिले आहे की गतवर्षी असो की यंदा, त्या त्या भागातल्या स्थानिक सरकारने करोना हाताळावा, हे चांगले. कारण प्रत्येक गोष्टीसाठी पालिकेने राज्याला राज्याने केंद्राला जबाबदार धरत जो काही जबरदस्त ड्रामा स्थानिक ते जागतिक रंगमंचावर घडवला त्याला त्याला तोड नाही. वादळ असो करोना असो, प्रत्येक विषयात राजकीय पोळी भाजण्याचं जे काही कौशल्य विविध राजकीय पक्षांनी दाखवलंय, त्याला तोड नाही.

अमेरिकेत ट्विन टॉवर उडवले त्याला सव्वा दशक झाले पण तेव्हा ना कोणी सरकारच्या नाकर्तेपणाची, इंटेलिजन्स फेल्युअरची लगेच चर्चा केली ना अमेरिकेतल्या कोणाही टीव्ही वाहिनीने हृदयद्रावक फोटो त्यांच्या बातम्यांमधे दाखवले. हे सारं सामूहिक शहाणपण आपल्या विविध क्षेत्रातल्या धुरिणांना कधी येणार… रोज उठून एक पंतप्रधानांना शिकवतो, दुसरा राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना आणि स्थानिक पातळीवर विरोधी पक्षाला करोनासाठी संसर्गासाठी खडे बोल सुनावतो. हे सारं सकस लोकशाहीसाठी चांगलं आहे का….

अहो हे लोक राजकारणात लोकांना म्हणजे मतदारांना गृहीत धरतात. पब्लिक मेमरी इज शॉर्ट वगैरे मथळे होणारी वाक्य वापरून मतदारांना गृहीत धरल्याने काय़ होते, याचे दर्शन पश्चिम बंगाल असो की अन्य कोणतीही इतिहासातली निवडणूक, अंगाशीच आले आहे. लोक सारा राग मतपेटीतून व्यक्त करतातच, हा आमचा तीस-बत्तीस वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे झोप काढणारा ससा गेला झाडाखाली आणि झोप होईपर्यंच कासवाने विजेतेपद पटकावले, हे आपण सारेच लहानपणी गोष्टीतून शिकलोय आणि प्रतिभासंपन्न दिग्दर्शिका बहुआयामी कलावंत सई परांजप्ये यांनी कथा नावाचा अप्रतिम चित्रपटही बनवून ठेवलेला आहे. खरोखर यू ट्यूब ला जाऊन तो अवश्य बघा. फारक शेख म्हणजे बाशु म्हणजे ससा आणि नसिरुद्दीन शाह म्हणजे राजाराम पुरुषोत्तम जोशी म्हणजे शर्यतीतला कासव. लीला मिश्रा, दीप्ती नवल, कृष्णदेव मुळगंद अहो खूप लोक होते आणि भारी म्हणजे पुण्यातल्या चाळीत चित्रीकरण झाले होते.

असो प्रत्येक पक्षाने ठरवायचेय की ससा व्हायचंय की कासव. पण कोठेही कुणीही सत्तेवर आले तरी देशाचे राज्याचे आणि शहरांचे भले करा.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button