शिवसेनेत बाबा आणि दादा वाद विकोपाला

Rajesh Kshirsagar & Sanjay Pawar

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) शिवसेनेतील (Shivsena) अंतर्गत वाद पुन्हा उफाळून आला आहे. माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) आणि जिल्हाप्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) या दोन गटात शहर आणि जिल्ह्यातील शिवसेनेची विभागणी आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळावा घेऊन राजेश क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे. अंतर्गत वादातून विधानसभेत सहा आमदार असलेली शिवसेना जिल्ह्यात एक वर आली. आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संजय बाबा आणि राजेश दादा असा बाबा आणि दादा गटाचा वाद पुन्हा उफाळून आला आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षाशी वेळोवेळी गद्दारी करणाऱ्या आणि पक्षातून हकालपट्टी झालेल्या दुर्गेश लिंग्रस, कमलाकर जगदाळे आदी गद्दारांना फूस लावून पक्षाच्या कार्यक्रमात उघडपणे सक्रीय सहभागी करून घेणारे जिल्हाप्रमुख संजय पवार हे सर्वपक्षीय जिल्हाप्रमुख असून, पक्षाचा आदेश धुडकावून लावणाऱ्या जिल्हाप्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेना शहर कार्यकारणीच्या बैठकीमध्ये आज करण्यात झाली. या सर्वांनी गेल्या काही निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात केलेल्या कामाचा, पक्षविरोधी केलेल्या कारवायांचा अहवाल पक्ष श्रेष्ठींना भेटून सादर करणार असल्याचे शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी सांगितले.

निवडणुकीमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात प्रचार करण्याचे काम या टोळक्याने केले आहे. विरोधी उमेदवारांच्या गळ्यात गळे घातलेले, कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करतानाचे अनेक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यांच्या या गद्दारीचा अहवाल संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर आणि इतर वरिष्ठ नेत्यांना पाठविल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पण एकीकडे “मातोश्री” शी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा करणारे जिल्हाप्रमुख संजय पवार पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात गद्दारांना पुन्हा घेतात यामुळे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पक्ष निष्ठा गहाण ठेवल्याचे स्पष्ट होत आहे.

जिल्हाप्रमुख संजय पवार यांची जिल्हाप्रमुख पदावर नियुक्ती झाल्यापासून त्यांनी पक्ष वाढीसाठी कोणतीही ठोस भूमिका न घेता स्वत:चा फायदा कसा होईल, हेच पाहिले आहे. गेल्या काही वर्षात त्यांच्या गद्दारीची अनेक उदाहरणे समोर येतील श्री.चंद्रदीप नरके यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात तानाजी आंग्रे यांना बंडखोरी करायला लाऊन शिवसेनेच्या उमेदवार पराभूत करण्याचे काम जिल्हाप्रमुखांनी केले आहे. शिवसेनेचे माजी मंत्री व संपर्कनेते दिवाकरजी रावते आणि संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या अंगावर धाऊन जाण्याचा अशोभनीय प्रकार या जिल्हाप्रमुख आणि टोळक्याने केला आहे. जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या सोबत असणारे टोळक्यातील अनेक स्वयंघोषित पदाधिकार्यांची यापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

परिवहन सभापती नियाज खान यांच्या घरावर हल्ला करताना या जिल्हाप्रमुख संजय पवार आणि त्यांच्या टोळक्यांना पक्षाचे प्रोटोकॉल कळाले नाहीत का? स्वतःच्या अंगाशी प्रकरण आल्यावर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधण्यात जिल्हाप्रमुख संजय पवार माहीर आहेत. जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी करण्यापेक्षा शहराच्या कार्यकारणीत ढवळाढवळ करण्याची कुबुद्धि वारंवार घडणाऱ्या घटनांनमधून दिसून येत आहे. गेल्या काही वर्षात “मातोश्री” वर टीका होत असताना जिल्हाप्रमुख म्हणून संजय पवार यांनी कधीही या टीकेस उत्तर देण्याची हिम्मत दाखवली नाही.

सर्वपक्षीय नेत्यांसोबत सलोख्याचे संबध ठेवून पक्षनिष्ठा वेशीला टांगण्याचा त्यांचा वैयक्तिक हव्यास पक्षास घातक आहे. त्यामुळेच त्यांची प्रतिमा “सेटलमेंट बादशहा” बनली आहे. त्यामुळे पक्ष आदेश डावलून गद्दारांना सोबत घेवून काम करणाऱ्या गद्दार संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी व्हावी, अशी मागणी शिवसेना शहर कार्यकारणीच्या बैठकीत समस्त पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकमताने केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER