बा विठ्ठला, साऱ्या इडापीडा टाळ रे बाबा…

Shailendra Paranjapeपंढरपूरच्या कार्तिकी एकादशीच्या पूजेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी निःसंदिग्धपणे सांगितलंय की आता पुन्हा लॉकडाऊनचे नाव काढू नका. राज्यात २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस या तीन पक्षांचे स्थिर सरकार सत्तेवर आले पण रिक्षाची तीनही चाकं तीन दिशांना जाऊ लागली तर काय होईल, तसं या सरकारचं रोजच्या रोज होत आहे.

वीजबिल माफ करू असं उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी जाहीर केलं होतं. त्यांनी अचानक घूमजाव केलं आणि नागरिकांना वीजबिलाचे पैसे भरावे लागतील, हे जाहीर केलं. वाढीव विजबिलाच्या विरोधात सर्वच पक्ष नाराज आहेत. विरोधी पक्षांनी रस्त्यावर उतरून आंदोलनही केली. सध्याच्या सरकारमधले मंत्री आणि कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उर्जामंत्री राऊत यांनी केलेली बिलमाफीची घोषणा सरकारमधल्या कोणाशीच चर्चा न करता केली होती आणि ही गोष्ट चूक होती, असं स्पष्टपणे सांगितल्याचं वृत्त प्रसारित झालंय. त्याच पद्धतीने करोना संकटानं जनता आधीच होरपळलेली असताना सरकारमधले तळ्यात मळ्यात काही संपत नाहीये, असंच दिसतंय.

लॉकडाऊनसंदर्भातल्या अजित पवार यांच्या पंढरपूरमधे केलेल्या विधानानंतर हेच पुन्हा एकदा सिद्ध झालंय. गेल्याच आठवड्यात पवार यांनी सांगितलं होतं की सात आठ दिवस रुग्णसंख्येची स्थिती काय होतेय हे बघून लॉकडाऊनबद्दल निर्णय घेऊ. त्याआधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन दिवसात लॉकडाऊनबद्दल काय तो निर्णय घेऊ, असं म्हटलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि यावेळी ती सुनामीच असू शकेल, असं सांगितलं होतं. मुख्यमंत्र्यांसह या तीन मंत्र्यांच्या विधानांमुळे जनतेमधे घबराट पसरली होती. सामान्य जनता तर भयभीत झालीच पण छोटे मोठे व्यावसायिक, व्यापारी हादरून गेले होते.

लॉकडाऊनच्या दुकानबंदीनंतर व्यवसायबंदीनंतर गेल्या दोन महिन्यात कसे बसे अर्थचक्र फिरू लागलेय. फायद्याचा विचार नाही झाला तरी किमान होणारा तोटा कसाबसा भरून काढता येईल का, ही चिंता उद्योगव्यवसाय क्षेत्राला लागलीय. अशा वेळी पुन्हा लॉकडाऊनचा घोर म्हटले तर उद्योगधंदे व्यवसाय अक्षरशः देशोधडीलाच लागले असते. पण आता किमान पुन्हा लॉकडाऊनचा विचार नाही, या पवार यांच्या विधानामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

अजित पवार सवंग प्रसिद्धीसाठी विधानं करणारे नेते नाहीत. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पहाटे जाऊन केलेल्या शपथविधीच्या वर्षपूर्तीला गेल्या आठवड्यातच समाज माध्यमांवरून ट्रोलिंग झाले होते. त्यावर अजित पवार फारसे बोललेले नाहीत, बोलतही नाहीत. पण पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीच्या पूजेनंतर पत्रकारांनी त्यांना छेडलेच. पत्रकारांनी विचारले की तुम्हा आषाढी एकादशीची पूजा कधी करणार ? म्हणजेच थोडक्यात तुम्ही मुख्यमंत्री कधी होणार ?

या प्रश्नावरही मुरब्बी राजकारणी असलेल्या अजित पवारांनी संयत उत्तर दिलं आहे. ते म्हणालेत की पांडुरंगाने जे दिलेय त्यात समाधान मानावे आणि पुढे चालावे. आषाढीची पूजा मुख्यमंत्री करतात, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. सतत मुख्यमंत्रीपदाची स्वप्नं बघत बघत पक्षांतर करावे लागलेल्यांनी, पक्षात अडगळीत गेलेल्यांनी आणि जनतेच्या मनात मीच मुख्यमंत्री, अशी सवंग हेडलाईनलंपट विधानं करणाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडून संयम शिकायला हवा.

सरकारमधे संदिग्धता असून चालत नाही आणि अजित पवार यांनी लॉकडाऊनचं सावट येणार नाही, हे निःसंदिग्धपणे स्पष्ट केलंय. तसंच राजकारणात सारं काही अनिश्चित असतं, हे पवार यांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे सध्या तरी करोना आणि लॉकडाऊनसह साऱ्या इडापीडा टळोत, इतकीच प्रार्थना आपण सारे पंढरपूरच्या विठोबाला करू या.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER