माजी न्यायमूर्ती बॅ. बी. एन. देशमुख यांचे निधन

B-n-deshmukh-passes-away

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती, माजी आमदार बॅ. बलभीमराव नरसिंगराव देशमुख (बी. एन.) काठीकर (वय ८५) यांचे गुरुवारी मध्यरात्री निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे.

बी. एन. देशमुख यांचे मूळ राहण्याचे गाव तुळजापूर तालुक्यातील काठी हे गाव. त्यांचे वडील उस्मानाबाद येथे वकिली व्यवसाय करीत असत. बी. एन. देशमुख यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सोलापूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. त्यांचे पुढील शिक्षण इंग्लंड येथे झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिवंगत रामराव आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसायला सुरुवात केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, असा त्यांचा आग्रह होता. औरंगाबादला खंडपीठाची आवश्यकता का आहे, यावर ते अनेकदा बोलत. औरंगाबाद येथे खंडपीठ सुरू झाल्यानंतर मुंबईतील वकिली व्यवसाय बंद करून ते औरंगाबादला आले. तिथं वकिली सुरू केली. १९८६ मध्ये त्यांची न्यायमूर्तिपदी नेमणूक झाली. ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिले. १९९७ मध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते निवृत्त झाले.

दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी राज्यसभा सदस्य नरसिंहराव देशमुख यांचे पुत्र, माजी खासदार उद्धवराव पाटील यांचे ते भाचे होत. उच्च व सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असताना राज्य विधानपरिषदेवर त्यांची निवड झाली होती. नंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसंच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ‘ऐतिहासिक’ ठरले होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER