अझारेंकाचा 6-0, 6-0 असा दणक्यात विजय

Victoria Azarenka

युएस ओपन (US Open) जिंकण्यात अंतिम फेरी गाठून अपयशी ठरलेल्या बेलारुसच्या (Belarus) व्हिक्टोरिया अझारेंकाने (Victoria Azarenka) यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन विजेती सोफिया केनिनचा (Sofia Kenin) अक्षरशः धुव्वा उडवला. रोम (Rome) येथील स्पर्धेच्या दुसऱ्याफेरीत अझारेंकाने जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या या खेळाडूला एकसुध्दा गेम जिंकू न देता 6-0, 6-0 असा फक्त तासाभरात दणदणीत विजय मिळवला. व्यावसायिक टेनिसमध्ये अशा निकालाचे फारच कमी सामने आहेत आणि त्यातल्या त्यात ग्रँड स्लॅम स्पर्धा विजेत्या खेळाडूवर तर असे विजय अगदीच दूर्मीळ आहेत.

अझारेंका गेल्याच आठवड्यात युएस ओपनच्या अंतिम सामन्यात नाओमी ओसाकाकडून पराभूत झाली होती. हार्डकोर्टवरील त्या स्पर्धेत अतिशय प्रभावी कामगिरी केल्यावर आठवडाभरातच क्ले कोर्टवर खेळताना तिने आपले सर्व प्रकारच्या मैदानावरील कौशल्य दाखवून दिले आहे.

या विजयाबद्दल अझारेंका म्हणाली की, सातत्य हे या दणदणीत विजयाचे रहस्य आहे. मी खूपच छान खेळले आणि सर्विसचा योग्य वापर केला असे दिसते. मी कोर्टचा पुरेपूर वापर केला आणि चेंडू मारण्यातही गतीत प्रभावी बदल केले.

पहिला सेट फक्त 22 मिनीटातच आटोपला. त्यात अझारेंकाकडून केवळ एकदाच चुकीचा फटका मारला गेल्याचे दिसले. या सेटमध्ये सोफियाला फक्त आठ गूण घेता आले. दुसऱ्या सेटमध्ये दोन गेम चांगले रंगले. एकदा तर तिने तीन ब्रेकपाॕईंट वाचवले आणि दुसऱ्यांदा व्हिकाला ड्युसपर्यंत खेचले,पण अझारेंकापुढे ती निष्प्रभ ठरली.

पुढच्या फेरीत आता अझारेंकाचा सामना दारिया कसाटकिना हिला करायचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER