आझाद गद्दार, त्यांचा काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा डाव – कुलदीप बिश्नोई भडकले

Gulab Nabi Addar & Bhisoni

दिल्ली : काँग्रेसच्या सध्याच्या परिस्थितीवर पक्षाचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी टीका केल्यानंतर हरयाणातील काँग्रेस कार्य समितीचे विशेष आमंत्रित सदस्य कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांनी सोमवारी राज्यसभेचे खासदार यांना गद्दार म्हटले व त्यांच्या काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे, असा आरोप केला.

बिश्नोई म्हणाले – आझाद यांचा पक्षाच्या विरोधात असणाऱ्या पक्षांच्या मदतीने काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा डाव आहे. आझाद यांनी गांधी कुटुंबाशी गद्दारी केली. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते आझाद यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाहीत.

हरयाणा प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ नेते बिश्नोई यांनी ट्विटवरुन व्हिडिओ पोस्ट केला. “आझाद साहेब यांनी केलेलं वक्तव्य ऐकले आणि थक्क झालो. खूप दुख: झाले, रागही आला. एवद्या वरिष्ठ नेत्याने अशा पद्धतीने सार्वजनिक प्रकारे असे वक्तव्य करने आश्चर्यकारक आहे. याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे.”

“आझाद साहेबांच्या सांगण्यानुसार पक्षामध्ये खालच्या स्तरापासून वरच्या स्तरापर्यंत निवडणूक झाली पाहिजे. मी त्यांना विचारु इच्छितो की जेव्हा त्यांना जम्मू-काश्मीर युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते तेव्हा त्यांनी निवडणुकांबद्दल भूमिका का घेतली नव्हती? जेव्हा त्यांना भारतीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले तेव्हा त्यांनी निवडणुकींबद्दलची इच्छा का बोलून दाखवली नाही?” असे प्रश्न बिश्नोई यांनी विचारले आहेत.

बिश्नोई यांनी आरोप केला, “आझाद साहेब तुम्ही विरोधी पक्षांच्या मदतीने आज पक्ष तोडण्याचा डाव आखत आहात. आम्ही तुमचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही. तुमचा इतिहास काय आहे? संपूर्ण आयुष्यात तुम्ही केवळ तीन निवडणुका लढवल्या आहेत. ज्या गांधी कुटुंबाने तुम्हाला पाच वेळा राज्यसभेवर पाठवले आज तुम्ही त्यांच्याविरोधात बोलत आहात. तुमच्यापेक्षा जास्त निवडणुका मी जिंकलो आहे. सहा निवडणुका जिंकलो.” असे व्हिडीओत म्हटलं आहे.

“जम्मू काश्मीरमध्ये तुम्हाला कोणी विचारत नाही आणि तुम्ही इथे सल्ले देता? तुम्हाला हरयाणा विधानसभा निवडणुकींचे प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तुम्ही पक्षाची वाट लावली. तुमच्या जागी इतर कोणी प्रभारी असते तर आज हरयाणामध्ये काँग्रेसचे सरकार असते,” असेही बिश्नोई म्हणाले.

“तुम्ही गांधी कुटुंबाविरोधात गद्दारी करत आहात. इंदिराजी आणि राजीवजींनी देशासाठी प्राण दिले आहेत. सोनियांनी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी अध्यक्ष पद स्वीकारले आहे. आज राहुल गांधी काँग्रेसला मजबूत करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये दौरे करत आहेत. प्रियंका गांधीही पक्षाला बळकटी देण्यासाठी लढत आहेत,” असं म्हणत बिश्नोई यांनी गांधी कुटुंबाचे कौतुक केले.

“आम्ही गांधी कुटुंबासोबत आहोत. राहुल आणि प्रियंका गांधी आहेत म्हणून आज काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मेहनत करण्यावर भर द्यावा. आपण पुन्हा एकदा काँग्रेससाठी चांगेल दिवस नक्कीच आणू,” असे आवाहन बिश्नोई यांनी कार्यकर्त्यांना केले. बिश्नोई हे हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे पुत्र आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER