प्रतिश्याय किंवा सर्दी – आयुर्वेद विचार

ayurvedic-remedies-to-fight-a-cold flu

प्रतिश्याय अथवा सर्दी  (cold)झाली की काही सुचेनासे करते. काहीही उपाय करा पण सर्दी आटोक्यात आणा अशी स्थिती येते. सतत वाहणारे नाक, रक्तवर्णी डोळे आणि तंद्रा हे सर्वांनीच अनुभवले असेल. कुणाची सर्दी अगदी १-२ दिवसात बरी होते कुणाची आठवडाभर महिनाभर त्रास देतच राहते. बऱ्याच जणांना अगदी थोडा जरी वातावरण किंवा खाण्यात बदल झाला तरी लगेच त्रास सुरु होतो. आयुर्वेदात (Ayurveda) प्रतिश्याय होण्याची काय कारणे सांगितली आहेत ते बघूया –

अवश्याय म्हणजेच ओस, दव यांचा सतत संपर्क थंड हवेत राहणे ( थंड वातावरण, थंड एसी मधे सतत राहणे.) उंच अपार्टमेंटमधील वरच्या फ्लॅटमधे थंड वाऱ्याचा संपर्क जास्त येणे सकाळी थंड हवेचे सेवन हे सुद्धा एक कारण ठरू शकते.
धूळ धूर नाकात जाणे.

  • उंच उशी घेणे जास्त झोपणे, सतत बोलणे, जागरण करणे, अति मैथून.
  • जल, स्थान, हवेत बदल होणे.
  • ऋतुवैषम्य – उदा. उन्हाळ्यात पाऊस किंवा थंडीत पाऊस पडणे.
  • मल मूत्र अश्रू शिंक इ. नैसर्गिक वेगांना अडकविणे.
  • रात्री दही खाणे. विरुद्धाहार घेणे उदा. मिल्कशेक इ.
    अजीर्ण म्हणजेच अन्न पचत नसेल तर वारंवार प्रतिश्याय होणे हा त्रास उद्भवू शकतो.

याशिवाय सर्वात मोठे व महत्त्वाचे कारण म्हणजे जास्त प्रमाणात पाणी पिणे. तहान नसतांना अति प्रमाणात पाणी पिणे. हे देखील प्रतिश्याय होण्याचे एक कारण आहे.

अशी विविध कारणे प्रतिश्याय होण्याकरीता आयुर्वेदात सांगितली आहेत. या कारणांचा सर्दी होण्याऱ्या व्यक्तींनी त्याग केल्यास निश्चितच आराम पडतो.

सर्दीची सुरवात होत असेल तर शींक येणे, अंग दुखणे, शरीरावर रोमांच येणे, थंडी वाजणे, डोके जड पडणे, नाकात शुष्कता जाणवणे अशी लक्षणे उत्पन्न होतात.
या अवस्थेच चिकित्सा योजना केली की प्रतिश्याय लगेच आटोक्यात येतो.

या अवस्थेत वाफ घेणे खूप फायदेशीर ठरते. जेवणात सूप, लापशीसारखे हलके व गरम मसाल्यांनी युक्त पदार्थ. गरम मसाले उदा. सुंठ, आले, लवंग, काळे मिरे अशा द्रव्यांचा आहारात वापर, या द्रव्यांचा काढा किंवा मधासह चाटण फायदेशीर ठरते.

वायूरहित म्हणजेच उबदार रुम मधे राहणे, डोक्याला गरम जाड कपडा उदा. लोकरीची टोपी घालणे. उबदार कपडे घालणे.

या गोष्टी प्रतिश्याय होईल अशी लक्षणे उत्पन्न झाल्यावर लगेच करावी ज्यायोगे लवकर उपशय मिळेल. सर्दी झाली की प्रथम कारणांचा शोध घेऊन त्यांचा त्याग करणे आवश्यक आहे. उदा. अजीर्ण असेल तर हलका आहार किंवा गरम पाणी पिणे , सुंठीचा काढा तसेच भूक लागल्याशिवाय न जेवणे हे पथ्य सुद्धा प्रतिश्याय कमी करतात.

सतत व तहान नसतांना उगीचच पाणी पिणे हे कारण प्रतिश्यायाचे असेल तर त्यानुसार उपाय योजना करावी. म्हणूनच कारणे शोधून त्याचा त्याग करणे प्रथम कर्तव्य व त्यानुसार चिकित्सा, औषधी प्रयोग आयुर्वेदतज्ज्ञ करतात.

जुनी सर्दी, वारंवार सर्दी यावर पंचकर्म, औषध, धूपन, नस्य अशा विविध चिकित्सा करता येतात. त्याकरीता आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला नक्की घ्यावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER