मातृत्त्व दिन निमित्ताने आयुर्वेद शास्त्र आणि मातृत्त्वाची काळजी !

आज मातृत्त्व दिन, कितीतरी संदेश आज वाचण्यात येतात. काही भावनिक, गमतीशीर, काही महती सांगणारे तर काही आठवणींना उजाळा देणारे संदेश. मातृत्त्व हे स्त्रीला लाभलेले एक वरदानच. बाळाची नाळ जी गर्भात जोडली जाते ती नेहमीकरीताच. गर्भातील बाळाची हालचाल पहिल्यांदा जाणवते व प्रसवानंतर बाळाला पहिल्यांदा जवळ घेतल्यानंतर तो स्पर्श, हे अवर्णनीय असते. या मातृत्त्वाला जपणे आणि या मातृत्त्वाच्या सुखाचा उपभोग घेता यावा याकरीता आयुर्वेद शास्त्रात खूप सखोल विचार केला आहे.

आयुर्वेद शास्त्रात सर्वच संहितेत स्त्री आरोग्य, गर्भावस्था राहण्यापूर्वी, गर्भावस्थेत व प्रसुतीनंतर स्त्रियांची विशेष काळजी वर्णित केली आहे. निरोगी बाळ व्हावे ही प्रत्येक आईची इच्छा असते. त्याकरीता अनेक सवयींना मुरड घालते. बाळाला गर्भात त्रास होऊ नये याकरीता लक्ष देते. पण नेमके काय करावे कसा आहार घ्यावा हे कळत नाही. आयुर्वेद शास्त्रात अगदी गर्भाधानापूर्वीपासूनच आहार विहार गर्भोपघातकर भाव याचे वर्णन केले आहे. मासानुमासिक बाळाची वाढ काय होते त्यानुसार काय बदल करावा हे आयुर्वेद शास्त्रात सांगितले आहे. गर्भावस्थे दरम्यान होणाऱ्या त्रासांना गर्भव्यापद म्हणून कसे हाताळावे काय औषधे द्यावी याकरीता आचार्यांनी वर्णन केले आहे. अगदी उदरावर निर्माण होणाऱ्या किक्विस ( Stretch marks) वर काय उपाय इतका सर्वांगिण विचार आयुर्वेदात केला आहे. प्रसवावेळी प्रसवागार (delivery room) कशी असावी सुतिकागार म्हणजेच बाळंतीणीची खोली कशी असावी, त्याची शुद्ध कशी करावी, इतका सखोल विचार करणारे आयुर्वेद शास्त्र आहे.

याशिवाय एखाद्या स्त्रीला काही त्रासामुळे मातृत्त्व अनुभवयास मिळत नसेल तर औषधी पंचकर्माची योजना केलेली आहे. प्रसवानंतर बाळंतिणीला उद्‌भवाणारे त्रास बाळाला त्रास न होता कसे नष्ट करता येईल याचे मार्गदर्शन आयुर्वेद शास्त्र करते. स्त्रियांना निरोगी राहून मातृत्त्व अनुभवता यावे याकरीता प्रत्येक अवस्थेचा विचार करणारे मार्गदर्शन करणारे आयुर्वेद शास्त्र आहे.

आई ! आईss गं या हाकेतच आईचे आपल्या आयुष्यातील महत्त्व दिसून येते. आई घरात असणे ही किती ऊब देणारी भावना आहे. या आईची काळजी आयुर्वेद शास्त्राने नक्कीच विचारपूर्वक केली आहे.

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button