आहारावरील संस्कार, त्याचे शरीरावर परिणाम !

Ayurveda news Dietary rites

आहार कसा असावा, कोणत्या पदार्थात काय घटकद्रव्ये असतात हे अनेक वेळा वाचतोच. आहारतज्ज्ञ प्रत्येक भाजी, डाळ इत्यादींच्या घटकद्रव्यांवरून, कॅलरी कार्बनुसार आहाराचे नियोजन करतात. आयुर्वेद (Ayurveda news) मात्र एखादा पदार्थ पचायला जड, हलका, दोषांवर परिणाम, मधुरादी रस, शीत वा उष्णवीर्य यावरून कोणत्या प्रकृती तसेच व्याधीत योग्य आहे ते सांगतात. कोणत्या पदार्थासह, किती मात्रेत घेत आहोत किंवा कसा तयार केला आहे, कोणत्या घटकांचा संयोग झाला यानुसार त्याचे शरीरावरील परिणाम बदलतात. याशिवाय भाजणे, तळणे, कुटणे, भिजविणे, संयोग करणे अशा विविध प्रक्रियेद्वारे आहाराचे गुण बदलतात.

काही उदाहरण बघूया –
दूध, तूप, साखर, गुळ यासारखे गोड पदार्थ शरीराला ताकद देणारे, बल, वर्ण, कांती, जीवनीय शक्ती वाढविणारे; पण अति मात्रेत घेतले तर विकार उत्पन्न करणार. प्रमाणशीर मद्यसुद्धा औषधाप्रमाणे काम करते.

शरीराचे पोषण करण्याकरिता आपण अन्न घेतो; पण भुकेच्या कमी मात्रेत घेतले तर कुपोषण, जास्त प्रमाणात घेतले तर आजारपण, त्रिदोष वाढवणार.

मध आणि तूप हे दोन्ही आरोग्याकरिता चांगले असे आपल्याला माहिती आहे; पण हेच मध व तूप सम प्रमाणात घेतले तर ते विषाप्रमाणे कार्य करते. द्रव्ये तीच पण संयोगामुळे हे पदार्थ आपले मूळचे आरोग्यकारक गुण सोडून शरीरात विषाप्रमाणे कार्य करतात.

सातूचे पीठ अतिशय वातुळ म्हणजे वात वाढविणारे आहे; पण पाणी किंवा दुधात टाकून प्यायल्यास तृप्ती देणारा, ताकद देणारा पदार्थ आहे.

आले पचायला जड असते; पण हेच आले वाळवून जेव्हा सुंठ बनते ते पचायला हलके होते. उष्णतेमुळे पदार्थाच्या गुणांवर परिणाम होतात हे यावरून लक्षात येते.

अग्नीमुळे पदार्थाचे गुण बदलतात हे आपण बऱ्याच वेळा बघतो. उदा. तांदूळ पचायला हलके असतात; पण ते भाजून कुटून तयार केलेले पोहे जड असतात. हेच तांदूळ दळून पिठी केल्यास गव्हापेक्षाही पचायला जड असतात.

धान, ज्वारी भाजून, अग्नी दिल्याने बनलेल्या लाह्या पचायला हलक्या असतात. हे आपण बघतोच. त्यामुळे लठ्ठपणा, कफाचे विकार, थायरॉईड अशा विकारात लाह्या फायदेशीर ठरतात. धान्य तेच अग्निसंस्कारमुळे गुण बदलले आणि त्या व्यक्तीला ते उपयोगी झाले.

दही पचायला जड, सूज आणणारे सांगितले आहे; पण त्याला घुसळून लोणी न काढता केलेले ताक पचायला हलके व सूज कमी करणारे असते. मध कफ कमी करणारे, विष कमी करणारे आहे; पण हेच मध गरम केल्यास विषाप्रमाणे कार्य करते. शरीराला हानी पोहचवते.

संस्कारामुळे गुणकर्म बदलतात, मग ते माणसाचे असो वा पदार्थाचे !

म्हणूनच आपले शरीर, वय, ऋतू , आजार, अग्नीचा विचार करून आहार घ्यावा. आता हेच बघा ना, तरुण वयात मेहनत करणाऱ्यांना जड, तळलेले मसालेदार, मांसाहार पचेलही; कदाचित तेच वृद्धावस्थेत याच मांसाचे सूप ताकद देणारे, हाडांना बळकटी देणारे, मुख्य म्हणजे पचणारे होईल.

थंडीच्या दिवसात सडकून भूक लागते. जठराग्नी तीव्र असते. गव्हाच्या पिठाचे, डाळीचे, काजू-बदाम-तूप घालून केलेले लाडू पचतात, बल वाढवितात. उन्हाळ्याच्या दिवसांत याच गहू, डाळ भाजून केलेले सातूचे पीठ पाण्यात घोळून घेतले तर अशक्तपणा, शरीरातील उष्णता कमी करतात. ही आहे ऋतूनुसार आहार योजना.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER